समितीच्या दौऱ्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबल्या
By admin | Published: June 23, 2017 05:24 PM2017-06-23T17:24:04+5:302017-06-23T17:24:04+5:30
आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अनुसूचित जमाती कल्याण समिती पुढच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असल्यामुळे आदिवासी विकास विभागाने चालू वर्षी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना सोडण्यास नकार दिला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे.
आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, परंतु कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या जागी सोडण्यापूर्वीच अनूसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा जाहीर झाल्यामुळे व समितीचे मुख्य काम आदिवासी विकास विभागाशीच निगडित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. समितीचा दौरा रद्द झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी लकडा लावला, विशेषत: गैरसोय होणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनही केले परंतु तोपर्र्यंत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या गैरलागू ठरल्या होत्या. यंदा मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या, परंतु पुन्हा समितीचा दौरा लागल्यामुळे आदिवासी विकास विभागाने बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यात लिपिक, गृहपाल, शिक्षकांचा समावेश आहे.