दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांची धरणे
By admin | Published: October 19, 2015 11:23 PM2015-10-19T23:23:43+5:302015-10-19T23:24:50+5:30
दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांची धरणे
नाशिक : केंद्र सरकारने भारत दूरसंचार निगममधील ६५ हजार भ्रमणध्वनी मनोरे वेगळे करून त्यांची एक नवीन उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत दूरसंचार निगमला मोठा आर्थिक तोटा होणार असल्याचा दावा करत या उपकंपनीच्या स्थापनेला विविध संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवित भारत दूरसंचार निगम कार्यालयासमोर सोमवारी (दि.१९) धरणे आंदोलन केले.
भारत दूरसंचार निगममधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, यासाठी बीएसएनएल व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे; मात्र अद्याप या समितीने उत्पादकतेवर आधारित बोनस देण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बोनस दिला जावा. २००७ सालाच्या अगोदर व नंतर सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांना कार्यरत कर्मचाऱ्यांप्रमाणे ७८.२ टक्के आयडीए स्केल मिळावे या मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये बीएसएनएल ई. यू., एस.एन.ई.ए., एन.एफ.टी.ई., बीएसएनएल, एआयबीएसएनएलईए आणि एसएनएटीटीए या प्रमुख संघटना सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)