महापालिकेत नोकरभरती
By admin | Published: December 31, 2016 12:24 AM2016-12-31T00:24:24+5:302016-12-31T00:24:41+5:30
अत्यावश्यक सेवा : शासनानंतर महासभेचा हिरवा कंदील
नाशिक : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेनेही वैद्यकीय अधिकारी व अभियंता तसेच मिस्तरी या एकूण ६५ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला. महापालिकेच्या महासभेत आयुक्तांकडून सदर भरतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. एकीकडे दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे प्रमाण वाढत असताना आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरतीस मनाई आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अत्यावश्यक सेवांवर मात्र मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्याने प्रशासन चिंतीत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे विशेष बाब म्हणून दि. २० एप्रिल व २१ मे २०१६ रोजी प्रस्ताव पाठविला होता आणि आस्थापना खर्चाच्या मर्यादेतून शिथिलता देऊन महापालिकेस नोकरभरतीची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही रिक्त पदे अत्यावश्यक बाब म्हणून भरती करण्याचा प्रस्ताव दि. १ जून २०१६ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्तरी या एकूण ६५ पदांसाठी सरळ सेवेने भरती करण्यास परवानगी दिली होती.
सदर भरतीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत ठेवण्यात आला असता, महापौर अशोक मुर्तडक यांनी त्यास कोणत्याही चर्चेविना हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३२, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २ आणि मिस्तरी १४ अशी एकूण ६५ पदे सरळ सेवेने भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, महासभेत, नगरचना विभागाच्या सर्वेक्षण कामासाठी सल्लागार सर्वेक्षक एजन्सीची नेमणूक करणे आणि नगररचना विभागातील मार्च २०१७ पर्यंतच्या सर्वेक्षण कामासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यासही महासभेने मंजुरी दिली.