महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे करवाढ होणार सौम्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:39 AM2018-02-28T01:39:15+5:302018-02-28T01:39:15+5:30
नाशिक : रोष आणि विरोधी पक्षांनी सुरू केलेली आंदोलने यामुळे भाजपा अडचणीत येऊ पाहत असतानाच घरपट्टीत केलेली दरवाढ सौम्य करण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले आहे.
नाशिक : सर्वत्र निर्माण झालेला रोष आणि विरोधी पक्षांनी सुरू केलेली आंदोलने यामुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत येऊ पाहत असतानाच महापालिकेने घरपट्टीत केलेली दरवाढ सौम्य करण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२७) व्यापारी-उद्योजक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महासभेत करवाढीचा निर्णय झाला असला तरी, तीनही आमदार आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून सर्वांना परवडेल अशीच दरवाढ केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दरवाढ निम्म्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्के वाढ केल्याने विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत तर भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.२६) चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी व उद्योग संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक होऊन त्यात महापौरांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते.