पत्नीसह मित्रावर गोळीबास करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:37 PM2018-08-27T17:37:28+5:302018-08-27T17:40:53+5:30
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाऊस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़ खटी यांनी सोमवारी (दि़२७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची सुनावली़ १९ आॅगस्ट २०१६ रोजी घडलेल्या या घटनेत सरकारी वकील कल्पक निबांळकर यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासून आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर केले होते़

आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता़ १९ आॅगस्ट २०१६ रोजी दीपकचा वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा़शांतीनगर, मांडसांगवी)हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी घरी गेला होता़ रात्रीच्या वेळी केक कापल्यानंतर सर्व मित्र दारू पिले व निघून गेले़ मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरीच थांबलेला होता़ परदेशीची पत्नी कोमल ही ठाकूर यास मामा मानत होती़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दीपक याने पत्नी कोमलसोबत भांडण सुरू केले़
पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशी याने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या़ यामध्ये पत्नीच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या़ यानंतर ठाकूर याने आरडाओरड केल्याने परदेशी यास पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायाधीश खटी यांच्याासमोर सुरू असलेल्या या खटल्यात परदेशीची पत्नी कोमल हिने सरकार पक्षाला सहकार्य केले नाही मात्र डोक्यास झालेली जखम व रुग्णालयातील उपचार ती नाकारू शकली नाही़
सरकारी वकील निंबाळकर यांनी घेतलेले आठ साक्षीदार व वैद्यकीय पुरावे यावरून परदेशीविरोधात गुन्हा सिद्ध झाला़ या खटल्यात परदेशी यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़