विविध योजनांच्या माध्यमातून शेती व्यवसायाचे सबलीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:06+5:302021-09-16T04:19:06+5:30
एस.आर. शिंदे /लोकमत न्यूज नेटवर्क पेठ - तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेला आदिवासीबहुल तालुका असून, सह्याद्री पर्वत उपरांगांमध्ये ...
एस.आर. शिंदे /लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ - तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेला आदिवासीबहुल तालुका असून, सह्याद्री पर्वत उपरांगांमध्ये दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, वरई ही पारंपरिक पिके घेतली जातात, तर रबी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू व हरभरा ही पिके घेतली जातात. जास्त पर्जन्यमान सरासरी दोन हजार मिमी असल्यामुळे भात हे तालुक्यातील महत्त्वाचे प्रमुख पूक असून शेतीचे अर्थकारण याच पिकावर प्रामुख्याने अवलंबून आहे. तालुक्यातलील ९० टक्के क्षेत्र जिरायत असून शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. वहितीलायक एकूण २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार हेक्टर (सुमारे ४६ टक्के) क्षेत्रावर भात हे पीक घेतले जाते. भाताखालोखाल नागली (५.५० हजार हेक्टर), वरई (२ हजार हेक्टर), कडधान्य (३ हजार हेक्टर) व गळीतधान्य (२ हजार हेक्टर) क्षेत्रावर घेतली जातात. बदलत्या काळात शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेताना शेतकरी नवनवीन पर्याय शोधत असून, त्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो व भोपळा पिकांची लागवड तालुक्यात वाढत असल्याचे दिसून येत आहे, तर फळपिकांमध्ये आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून येत आहे.
पेठ तालुक्यात शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती आवार उपलब्ध नाही. भात, नागली व इतर पिकांची शेतकऱ्यांमार्फत स्थानिक बाजारात विक्री केली जाते, त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळामार्फत शासकीय दराने शेतमाल खरेदी केला जातो. पेठ तालुक्यासाठी भाजीपाला विक्री मुख्यत: गुजरात राज्यातील जवळच्या बाजारात केली जाते, तर आंबा व इतर फळ पिकांची विक्री नाशिक बाजारात केली जाते.
---------------------
पीक प्रात्यक्षिक
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत तालुक्यात भात पिकाचे 40 हेक्टर क्षेत्रावर, तर नागली पिकाचे 300 हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. सदर प्रात्यक्षिकासाठी ३४ गावांतील ८५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे व प्रति शेतकरी ०.४० हेक्टर क्षेत्रावर सुधारित बियाणे वापर, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबी राबविण्यात येत आहेत.
---------------------------
पेठ तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी काही काळ पावसाने दडी मारली असली तरी नंतरच्या काळात सातत्य राखल्याने सरासरीपर्यंत पर्जन्यमान गेले आहे. भात व इतर पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कात राहून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले असल्यास कृषी सहायक किंवा पीक विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.
-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ (१५ पेठ खबरबात)
150921\15nsk_4_15092021_13.jpg
१५ पेठ खबरबात