मोकळा भूखंड बनला डम्पिंग ग्राउंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:43 AM2017-10-31T00:43:34+5:302017-10-31T00:43:42+5:30
दत्तमंदिररोड येथील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड झाल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने मोकळ्या भूखंडावर घाण, कचरा, माती आणून टाकणाºयांवर व एसटी महामंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत परिसरातील रहिवासी, महिला, खेळाडू आदींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मनोज मालपाणी ।
नाशिकरोड : दत्तमंदिररोड येथील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड झाल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने मोकळ्या भूखंडावर घाण, कचरा, माती आणून टाकणाºयांवर व एसटी महामंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत परिसरातील रहिवासी, महिला, खेळाडू आदींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दत्तमंदिररोड विकास मतिमंद शाळेशेजारी एसटी महामंडळाचा मोकळा मोठा कुंपण नसलेला भूखंड पडून आहे. कुंभमेळ्याच्या काळात बस डेपो बांधण्यात आला होता. मात्र या बस डेपोमध्ये येण्या-जाण्यासाठी असलेला दत्तमंदिररोड व आर्टिलरी सेंटररोड हा पुरेसा नसल्याने बस डेपो धूळखात पडून आहे. त्याकडे एसटी महामंडळाचे लक्ष नसल्याने टवाळखोर व मद्यपींचा अड्डा झाला आहे.
बाभळीची झाडे तोडण्याची गरज
मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढल्याने जंगलसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आनंदनगर रोडलगतच माती, रॅबीटचे डोंगर झाल्याने त्यांच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाखाली प्रेमीयुगुल, मद्यपी, व्हाईटनर पिणाºयांचे अड्डे झाले आहेत. चारचाकी गाड्या, रिक्षात येणारे जोडपे तेथे वाहने उभी करून अश्लील प्रकार करत असतात. गर्दुंले, भुरट्या चोरांचा सतत या ठिकाणी वावर असतो. डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीसोबत रहिवासी व महिलांना हादेखील मोठा त्रास झाला आहे. एसटी महामंडळ, मनपा, लोकप्रतिनिधी यांनी या भूखंडावरील बाभळीची झाडे तोडावीत. जेणेकरून तेथे चालणाºया गैर व अवैध प्रकाराला आळा बसेल. पोलिसांनीदेखील या ठिकाणी गस्त वाढवून टवाळखोर, प्रेमीयुगुल, मद्यपींचा बंदोबस्त करावा. तसेच मनपा शाळा क्रमांक १२५ च्या क्रीडांगणावर दुपारी वावरणाºया प्रेमीयुगुलांवर कारवाई करावी, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे.
आमदारांनी लक्ष घालावे
दत्तमंदिररोड येथील बस डेपो व मोकळा भूखंड त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती व रस्त्याच्या आकारामुळे एसटी महामंडळाच्या उपयोगाचा नसल्याचे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलतात. त्यामुळे नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी लक्ष घालून सदर भूखंड मनपाकडे वर्ग केल्यास त्याचा शहरासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच एसटी महामंडळाला-देखील पर्यायी जागा उपलब्ध होऊन त्यांची गैरसोय दूर होईल. राज्यात व मनपामध्ये भाजपा सत्तास्थानी असल्याने हा प्रश्न सुटू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाने मोकळ्या भूखंडाला कुंपण घालावे, अशी मागणी केली जात आहे.
कायदेशीर कारवाईची गरज
एसटी महामंडळाच्या मोकळ्या भूखंडावर माती, रॅबीट, दगड, विटा तसेच केरकचरा, खाद्यपदार्थ आणून टाकणाºयांवर मनपाने दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. पॉश लोकवस्तीतील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड होत असून रहिवासी, खेळाडू, विद्यार्थी, महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने डम्पिंग ग्राउंड झालेल्या भूखंडाबाबत एसटी महामंडळावरदेखील कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
भटक्या जनावरांचा वावर
दत्तमंदिररोड व आनंदनगर रस्त्यापर्यंत मोकळा भूखंड असून, तेथे मोठ्या प्रमाणात घाण, केरकचरा, खाद्यपदार्थ, माती, दगड आदी आणून टाकले जाते. परिसरात कुठे इमारतीसाठी खोदाई करण्यात आली तर माती, रॅबीट तेथे आणून टाकले जाते. मुक्तिधाम-सोमाणी उद्यान परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थ रात्री येथे आणून टाकले जातात. तसेच काही नागरिक, महिला घरातील केरकचरा, उरलेले खाद्यपदार्थ पिशवीत बांधून टाकतात. त्यामुळे त्या भागात सतत दुर्गंधी पसरलेली असते. टाकलेल्या खाद्यपदार्थांमुळे कुत्री, डुकरे आदी प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री अपघाताला आमंत्रण मिळत आहे. या मोकळ्या भूखंडाशेजारीच दाट लोकवस्ती असून, दुसºया बाजूला मतिमंद शाळा, मनपा शाळा व शाळेचे मोठे क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरील जॉगिंग ट्रॅकवर लहानांपासून वयोवृद्धापर्यंत फिरायला येतात.