रिकाम्या धावल्या बसेस तरीही पायपीट
By admin | Published: September 26, 2015 12:09 AM2015-09-26T00:09:45+5:302015-09-26T00:10:33+5:30
रिकाम्या धावल्या बसेस तरीही पायपीट
नाशिक : प्रवाशांची पायपीट सुरू असतानाही नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे अनेक बसगाड्या रिकाम्या धावत असल्याने प्रवासी भाविकांनी संताप व्यक्त केला. हा उरफाटा प्रकार घडण्यास पुन्हा महामंडळ आणि पोलीस यंत्रणेतील असमन्वय कारणीभूत ठरला. पर्वणीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी बारा वाजता कुशार्वत तीर्थ भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १२ वाजेच्या आत भाविकांना त्र्यंबकमध्ये आणूच नये असे पोलिसांचे म्हणणे होते. तथापि, गुरुवारी दुपारनंतर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची संख्या वाढली. हे भाविक बसगाड्यांनी नाशिककडे गेल्याशिवाय त्र्यंबकेश्वरात नवीन भाविकांसाठी जागा उपलब्ध होणे शक्य नव्हते. त्यामुळे अगोदरच्या भाविकांना घेऊन जाण्यासाठी बस पाठवा असे पोलिसांनी महामंडळाला सांगितले; मात्र नवीन भाविकांना पाठवण्यासही मनाई केल्याने नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या बसमधील प्रवाशांना खंबाळे येथे उतरवून रिकाम्या बसगाड्या त्र्यंबकला पाठविण्यात आल्या. परंतु भाविकांची पायपीट होत असताना एसटी बसगाड्या भरून जात होत्या आणि त्या थांबतही नसल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. तथापि पोलिसांच्या आदेशामुळेच हा प्रकार घडल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अर्थात, काही बसगाड्या पूर्ण क्षमतेने भरून आणि बसच्या छतावर बसून प्रवासी जात असल्याने पायपीट करणाऱ्यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला; मात्र या गाड्या नाशिकरोड येथून आल्याअसून प्रवाशांनी भरलेल्या बसगाड्या या सिंहस्थ बस स्थानकाजवळच सोडल्या जात असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले; मात्र भाविकांची गर्दी नको म्हणून त्यांना अर्धवट मार्गावर सोडून देणारे महामंडळ प्रत्यक्षात मात्र नाशिकरोड येथील भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जात असल्याने प्रवाशांना कृतीचे कोडे उलगडलेच नाही.