‘इमू’ फसवणूक; संशयितांच्या मालमत्तेचा शोध सुरू
By Admin | Updated: October 8, 2015 00:14 IST2015-10-08T00:14:13+5:302015-10-08T00:14:38+5:30
‘इमू’ फसवणूक; संशयितांच्या मालमत्तेचा शोध सुरू

‘इमू’ फसवणूक; संशयितांच्या मालमत्तेचा शोध सुरू
नाशिक : फायदेशीर गुंतवणूक व दुप्पट परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘इमू’ कंपनीतील पाच संशयितांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे़ या संशयितांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
२०११ मध्ये इंडियन इमू लाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने इमू पक्षिपालन व्यवसायासाठी गुंतवणूकदारांना फायदेशीर गुंतवणूक व दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून प्रमुख संशयित हरिष दीक्षित व त्याच्या सहकाऱ्यांनी शेतकरी तसेच गुंतवणूकदारांची कोट्यवधी रु पयांची फसवणूक केली़ या प्रकरणी संशयित राजेंद्र रामराव निकम (रा. पेठरोड), संतोष गोविंद मैंद (रा. जेलरोड), राजेंद्र आनंदा राऊत (रा. मनमाड) व दीपक वसंत पवार (रा. नाशिक) यांना सोमवारी तर पाचवा संशयित गंगाधर गणपत जाणराव (रा. भगूर) यास मंगळवारी अटक केली होती़ या सर्वांना न्यायालयाने १५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे पाचही संशयित इमू कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते. जमा केलेली रक्कम कंपनीकडे न भरता परस्पर विल्हेवाट लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक व त्यामधून जमा केलेली माया, फरार संशयित हरिष दीक्षितशी असलेला संपर्क व्यवहार अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस मिळवित आहेत़