महिला बचतगटांना प्रशिक्षण देऊन सक्षम करावे : विजयश्री चुंबळे जिल्हा नियामक मंडळ समिती बैठक
By admin | Published: February 11, 2015 12:52 AM2015-02-11T00:52:02+5:302015-02-11T00:57:32+5:30
महिला बचतगटांना प्रशिक्षण देऊन सक्षम करावे : विजयश्री चुंबळे जिल्हा नियामक मंडळ समिती बैठक
नाशिक : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला बचतगटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दिल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात नाशिक नियामक मंडळाच्या समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीची आढावा सभा तीन महिन्यांतून एकदा होणे अपेक्षित होते. परंतु २ वर्षांपासून या सभेचे आयोजन झालेले नव्हते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस पत्रव्यवहार करून या सभेचे आयोजन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी योजनांचा लाभ देण्याबाबत सूचित केले. इंदिरा आवास योजनेच्या घरकुल योजनेचा आर्थिक आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचतगटांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे व अनुदानाचे वाटप बॅँकांनी तत्काळ करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बचतगटांसाठी चांगले व्यवसाय निवडून त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानामार्फत योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्याच्या सूचना यावेळी विजयश्री चुंबळे यांनी दिल्या. लघुउद्योग भारती महिला उद्योजक विकास मंडळाच्या नलिनी कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना शिवण्याचे प्रशिक्षण मशीन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दीपिका चव्हाण, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, अनिता जाधव, गोपाळ लहांगे, अलका चौधरी, संगीता ठाकरे, तसेच नितीन सोनवणे, रवींद्र भोये, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)