चारा छावण्यांसाठी तहसीलदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 05:40 PM2018-11-04T17:40:25+5:302018-11-04T17:41:43+5:30
सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोंदे, दापूर व खंबाळे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील अनेक गावांना प्रतिमाणशी २० लिटरप्रमाणे पाणी टॅँकरने देण्यात येते. मात्र, हे पाणी पुरसे नसल्याने वाढीव स्वरूपात पाणी मिळावे. जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच चारा छावण्या सुरू करण्याची मागणी भाबड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गोंदे येथील सरपंच उषा सोनवणे यांनीही पाणीटंचाई, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. खंबाळे येथील सरपंच शोभा आंधळे यांनीही याच आशयाचे निवेदन तहसीलदार, तसेच गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी दत्तात्रय सोनवणे, भागवत तांबे, दत्तू तांबे, दगू तांबे, संजय सांगळे, कैलास तांबे, दापूर येथील उपसरपंच अशोक काळे, मोहन काकड, रामदास आव्हाड, खंबाळे येथील भाऊसाहेब आंधळे, विश्वनाथ आंधळे, कारभारी आंधळे, सुरेश सांगळे, शिवाजी दराडे आदी उपस्थित होते.