अतिक्रमण उपआयुक्तांची चौकशी

By admin | Published: June 24, 2017 12:42 AM2017-06-24T00:42:54+5:302017-06-24T00:43:07+5:30

नाशिक : महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली.

Encroachment of Deputy Commissioner | अतिक्रमण उपआयुक्तांची चौकशी

अतिक्रमण उपआयुक्तांची चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह विविध कर विभागाचे सहायक अधीक्षक सुरेश अहेर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. सदर समितीने तीन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. दरम्यान, सदस्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती परंतु, स्थायीच्या अधिकारानुसार सभापतींनी चौकशी समिती नियुक्त केली. स्थायी समितीच्या सभेत मुशीर सय्यद, सूर्यकांत लवटे, वत्सला खैरे, जगदीश पाटील, डी. जी. सूर्यवंशी, अलका अहिरे, मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, सीमा ताजणे, भागवत आरोटे, विशाल संगमनेरे, सुनीता पिंगळे व श्याम बडोदे यांनी सभापतींना पत्र देऊन अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि विविध कर विभागाचे सहायक अधीक्षक सुरेश अहेर यांच्या गैरकारभाराची चौकशी करत निलंबनाची मागणी केली.  यावेळी मुकेश शहाणे यांनी अनधिकृत फलकांविरुद्ध इतकी वर्षे का कारवाई झाली नाही? त्यामुळे मनपाचा महसूल बुडाल्याची तक्रार करत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. श्याम बडोदे यांनी वडाळागावातील अनधिकृत गुदामे हटविण्यासंबंधी तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. भागवत आरोटे यांनी भंगार बाजार वाढण्यामागे याच अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगत पुन्हा एकदा भंगार बाजार बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रवीण तिदमे यांनी ठरावीक भागातच अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होत असल्याबद्दल शंका उपस्थित  केली.  जगदीश पाटील यांनी गाळ्यांच्या भाडेमूल्यात तफावत असल्याचे स्पष्ट करत चौकशी समिती नियुक्त करण्याची सूचना केली. सूर्यकांत लवटे यांनीही बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याची तक्रार केली. मुशीर सय्यद यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थींमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महापालिकेत दलालांची साखळीच कार्यरत असल्याचा आरोप केला. डी. जी. सूर्यवंशी, सीमा ताजणे, शशिकांत जाधव यांनीही अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी केली.
शेवटी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीला असलेल्या अधिकारानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. या समितीत मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, स्थायी समितीचे सदस्य शशिकांत जाधव, सूर्यकांत लवटे, मुशीर सय्यद, जगदीश पाटील, मुकेश शहाणे व डी. जी. सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आला. सदर समितीने नि:पक्षपातीपणे चौकशी करत तीन महिन्यांच्या आत  चौकशी अहवाल स्थायीला सादर करण्याचे आदेशही सभापती गांगुर्डे यांनी दिले.
बहिरम यांचे स्पष्टीकरण
सभापतींनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. त्यानुसार बहिरम यांनी सांगितले, शहरात केलेल्या सर्व्हेनुसार १५८ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले असून, नोटिसा दिल्यानंतर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले नाहीत त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जात आहे. हॉकर्स झोनबाबतही सहाही विभागांत प्रत्येकी दोन झोन कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खासगी जागेतील अतिक्रमणही काढण्याची कार्यवाही चालू आहे. मोकाट जनावरे पकडण्याबाबतही ठेका देण्यात आल्याची माहिती बहिरम यांनी दिली.



 

Web Title: Encroachment of Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.