राजीवनगर झोपडपट्टीलगत पदपथावर अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: June 19, 2017 07:11 PM2017-06-19T19:11:27+5:302017-06-19T19:11:27+5:30
शंभरफुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावर वाढत्या टपऱ्यांमुळे पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : शंभरफुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावर वाढत्या टपऱ्यांमुळे पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरून जीवमुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवित आहे. त्यांना शंभर फुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या पदपथावरील अतिक्रमण दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळच्या मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक १चा १०० फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच वापर करतात. परंतु १०० फुटी रस्त्यास राजीवनगर झोपडपट्टीतील काही झोपड्या रस्त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरत होत्या. अखेर सिंहस्थापूर्वी मोठा पोलीसफाटा घेऊन सुमारे ७० अनधिकृत झोपड्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पदपथावरील झोपड्या आणि टपऱ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु अतिक्रमण विभागाची पाठफिरताच अतिक्रमण सुरुवात झाली होती. राजीवनगर झोपडपट्टीलगतच शंभरफुटी रस्त्यावर असलेल्या दोन्ही बाजूच्या पदपथावर झोपड्या आणि टपऱ्या दिवसागणिक वाढतच आहे.