गोदाघाटावर अतिक्रमण
By admin | Published: February 10, 2017 12:44 AM2017-02-10T00:44:03+5:302017-02-10T00:44:13+5:30
कचऱ्याचे साम्राज्य : भिकारी, फेरीवाल्यांचा त्रास, पर्यटकांची नाराजी
नाशिक : एखाद्या शहराला नदीचा काठ लाभणे ही त्या शहराच्या उत्कर्षाचा पाया मानला जातो. नदीमुळेच शहराचा विकास घडून येतो, असे इतिहासातून दिसते. परंतु ज्या नदीमुळे शहराचा विकास झाला त्याच गोदावरीकडे नाशिककरांचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येते. गोदाघाटावरील वाढता अतिक्रमणांचा विळखा, कचऱ्याचे साम्राज्य, भिकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा त्रास यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे नाशिक महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मनपा प्रशासनाचे विकासकामांमुळे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते. त्यातच शहर स्वच्छतेचा तर बोजबारा उडालेला दिसतो. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. विशेषत: गोदाघाटावर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. रामकुंडाच्या आजूबाजूला फूलविक्रेते आणि प्रसादविके्रत्यांचा गराडा पडलेला असतो. त्यातच खाद्य पदार्थ स्टॉल, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अहल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगेमहाराज पटांगणापर्यंत सर्वत्र दिसते. गोदाघाटाची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता झालेली दिसत नाही. याबाबत मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असल्याचे नागरिक व भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)