नासर्डीपात्रात अतिक्रमण
By Admin | Published: February 2, 2016 11:05 PM2016-02-02T23:05:12+5:302016-02-02T23:07:42+5:30
नासर्डीपात्रात अतिक्रमण
इंदिरानगर : मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नासर्डी नदीच्या पात्रात दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. तरीही संबंधित विभागाकडून नदीपात्रात वाढते अतिक्रमण काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरात हातावर पोट भरणारी वसाहत म्हणून ओळखली जाते. शहरातील विविध भागातून झोपडपट्टी उठविण्यात येऊन शिवाजीवाडीत म्हाडा योजनेतून काही नागरिकांना घरे बांधून दिली आहेत. काही रहिवाशांना सुमारे आठ महिन्यांपूर्वीच भारतनगरलगत घरकुल योजनेत घरे देण्यात आली. तरीही परिसरात झोपड्या आणि अनधिकृत घरे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहेत. परिसरात झोपड्या टाकण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने आणि सिंहस्थानिमित्ताने १०० फुटी रस्त्यावरच असलेल्या सुमारे ६० झोपड्या अतिक्रमण विभागाने हटविल्या होत्या. त्यापैकी काही रहिवाशांनी आणि सुमारे आठ वर्षांपासून एक एक करून मुंबई नाका ते शिवाजीवाडी नासर्डी नदीच्या पात्रात विटा व मातीची भर टाकून घरे बांधण्यात आली. आतापर्यंत सुमारे २५ घरे सर्रासपणे नदीपात्रात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र कमी झाले आहे. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहते तेव्हा या सर्व रहिवाशांना धोका निर्माण होऊन संसार उपयोगी वस्तूंसह जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने फक्त धोक्याची घरे असल्याची नोटीस दिली जाते. परंतु नदीपात्रात असलेली धोक्याची घरे काढण्यासाठी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. जोपर्यंत मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत कारवाई करायची नाही अशी पद्धत केव्हा बंद होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)