बोकटे येथे यात्रेच्या राखीव जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 10:48 PM2021-03-03T22:48:44+5:302021-03-04T01:04:48+5:30
अंदरसूल : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेच्या राखीव जागेवर झालेले अतिक्रमण न हटविल्यास येत्या १५ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
अंदरसूल : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेच्या राखीव जागेवर झालेले अतिक्रमण न हटविल्यास येत्या १५ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
यात्रेसाठी ठिकठिकाणांहून विविध व्यावसायिक येत असतात. बोकटे ग्रामपंचायतीने त्यांना जागा उपलब्ध केली होती. मात्र, त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने यात्रेसाठी असणारी राखीव जागा पूर्णपणे व्यापली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यात्रेच्या जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सदर घटनेकडे बोकटे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील भाविक व ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले असून त्यात सीताराम दाभाडे, रावसाहेब लासुरे, गोरख काळे, सकाहरी दाभाडे, संदीप साळवे, सोमनाथ दाभाडे, संभाजी दाभाडे, प्रकाश दाभाडे, रामनाथ दाभाडे आदींच्या स्वाक्षऱ्यांसह देवळणे,दुगलगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे पाठिंबा असलेले पत्र जोडण्यात आले आहे. सदर निवेदन सरपंच प्रताप दाभाडे व ग्रामसेवक मोरे यांना देण्यात आले.
बोकटे ग्रामपंचायत यात्रेसाठी जागा देऊ शकत नसेल आणि भाविकांची गैरसोय होत असेल तर ट्रस्ट करण्यासह देवळाणे गावात यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी.
- गोरख काळे,उपसरपंच, देवळाणे.
येवला तालुक्यातील विद्यमान आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी लक्ष घालावे व असंख्य भाविकांना न्याय मिळवून द्यावा.
- रावसाहेब लासुरे, सरपंच, दुगलगाव