राजीवनगर झोपडपट्टीलगत रस्त्यावर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:31+5:302021-08-26T04:17:31+5:30
शंभर फुटी रस्ता ते विशाखा कॉलनीदरम्यान असलेल्या रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीच्या रस्त्यालगत दुतर्फा अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ...
शंभर फुटी रस्ता ते विशाखा कॉलनीदरम्यान असलेल्या रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीच्या रस्त्यालगत दुतर्फा अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून राजीवनगरकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच शंभर फुटी रस्ताही पन्नास फुटी बनला आहे. संबंधित मालकाला पदपथ बांधण्यासाठी जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार करण्यात आले. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मुंबई - आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गाला जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर झोपडपट्टी, कलानगर, वडाळा गाव डीजीपीनगर क्रमांक एक, आदी मार्गे शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आला. रस्त्यालगत विविध उपनगरे असल्याने वाहनांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी जागेत असल्याने त्या ठिकाणी सुमारे आठशे ते एक हजार झोपड्या झाल्या आहेत. झोपड्या टाकण्यास जागा नसल्याने सर्रासपणे शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत झोपड्या बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शंभर फुटी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडून होते. त्यावेळी सुमारे साडेसहाशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली. रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करून दुतर्फा पदपथ तयार करण्यात आले होते. काही दिवसांतच राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर सुमारे ८० ते ९० अनधिकृत झोपड्या बसवण्यात आल्या तसेच झोपडपट्टीतील चार चाकी व दुचाकी शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा लावत असल्याने वाहतूक रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.