नाशिकरोड परिसरात पदपथावर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:16 AM2019-12-17T01:16:20+5:302019-12-17T01:16:42+5:30
परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
नाशिकरोड : परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
मनपा शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांना नगरसेविका संगीता गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बिटको चौक हा नाशिकरोडचा केंद्रबिंदू आहे. बिटको ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा, बिटको ते महात्मा गांधी पुतळा व बिटको ते दत्तमंदिर सिग्नल या हमरस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा एक ते दीड फूट उंचीचे चुकीचे फुटपाथ बनविण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिक संकुलात येणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने फुटपाथच्या बाहेर लावावी लागतात. त्यामुळे त्या भागात सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.
जादा उंचीच्या फुटपाथमुळे दुचाकी, चारचाकी वाहने ही संबंधित दुकान, कार्यालय यांच्या पुढील मोकळ्या जागेपर्यंत जात नाही. त्यामुळे सदर वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात.
वाहनतळाचा प्रश्न सोडवावा
फुटपाथमुळे दुकानापुढील अथवा इमारतीच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नाशिकरोड परिसरातील प्रमुख हमरस्त्यावरील चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आलेले फुटपाथ काढून ते रस्ता समान केल्यास पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. फुटपाथ बनविताना वरील सर्व बाबींचा विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.