त्रिमूर्ती चौक परिसरात अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:44 AM2019-04-26T00:44:10+5:302019-04-26T00:44:25+5:30
महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको : महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली होती. या मोहिमेत मनपाने दिव्या अॅडलॅब, दुर्गानगर फे्रशअप बेकरीसमोरील तसेच उत्तमनगर ते विजयनगर रस्त्यासह सुमारे दोनशेहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले होते. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्याने मुख्य रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. महापालिकेच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपूर्वी सिडको भागातील मुख्य चौक व रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत सुरुवातील मनपाने त्रिमूर्ती चौक येथील मुख्य रस्त्याला अडथळे ठरणारे अतिक्रमण काढले. दिव्या अॅडलॅब परिसरातून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर याठिकाणी दाखल झालेले सिडकोचे तत्कालीन प्रशासक अनिल झोपे यांनी दिव्या अॅडलॅब दुकानाबाहेरील अतिक्रमण करण्यात आलेली जागा ही सार्वजनिक असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर मनपाने याठिकाणचे अतिक्रमण हटविले होते. यानंतर मनपाने आपला मोर्चा दुर्गानगर फ्रेशअप बेकरीसमोरील दुकानांकडे वळविला. यावेळी येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पंचवीसहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले होते. तसेच यानंतर ही मोहीम उत्तमनगर ते विजयनगर या भागात राबविण्यात आली होती. परंतु याठिकाणी आज पुन्हा अतिक्रमण झाल्याचे दिसून येत असून, मनपाने येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
स्वत:हून काढले होते अतिक्रमण
गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण मनपाने काढल्यानंतर रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मनपाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरातील अन्य दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण हटवित असल्याचे दिसून आले. परंतु आज पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महिला व बालक बचावले
गेल्या मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास एक महिला दुचाकीवरून मुलाला घेऊन जात असताना त्रिमूर्ती चौक येथून वळताना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याने महिला दुचाकीवरून खाली पडली. यावेळी सुदैवाने त्यातून ती बचावली. या भागात अशा दुर्घटना वारंवार घडतात.