उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:11 AM2019-08-28T00:11:48+5:302019-08-28T00:12:16+5:30
नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेतेबांधव सकाळी आपला व्यवसाय करतात. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांची गैरसोय होत होती. तसेच भाजीबाजारात असलेल्या अस्वच्छतेमुळे विक्रेत्यांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाली होती. याबाबत नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी या संस्थेच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना १५ दिवसांपूर्वीच याबाबत निवेदन दिले होते. मात्र तरीदेखील मनपा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.
मनपा विभागीय कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात ठिय्या आंदोलन करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते सुनील मगर, महेश कुलथे, भारत माळवे, बाळासाहेब चंद्रमोरे, हेमंत पोटे, किशोर सोनवणे, गौतम सोनवणे, इस्माईल पठाण, मनोहर खोले, उल्हास कुलथे, विजय सोनार, हर्षल ठोसर आदी एकत्रा आले होते. विभागीय अधिकारी नितीन नेर व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे जनार्दन घंटे यांनी वृत्तपत्र विक्रेता बांधवांशी चर्चा
करून उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविले.
मनपा अधिकारी अतिक्रमण काढत असताना त्या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या विक्रेत्याने वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत वृत्तपत्र विक्रेते इब्राहिम इस्माईल खान यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना धमकावणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी केली आहे.