शहरातील दुभाजकांवर अतिक्रमण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:01 AM2018-01-28T01:01:05+5:302018-01-28T01:01:27+5:30
शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा तसेच नाशिक-पुणे महामार्गासह अन्य ठिकाणी दुभाजकांवर अतिक्रमण होत असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा तर पोहोचत आहेच शिवाय, अस्वच्छतेलाही निमंत्रण मिळत आहे. या साºया प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
नाशिक : शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा तसेच नाशिक-पुणे महामार्गासह अन्य ठिकाणी दुभाजकांवर अतिक्रमण होत असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा तर पोहोचत आहेच शिवाय, अस्वच्छतेलाही निमंत्रण मिळत आहे. या साºया प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली होणारे अतिक्रमण मोठी डोकेदुखी ठरली आहे. मुंबई नाका असो अथवा पंचवटीतील परिसर याठिकाणी उड्डाणपुलाखाली मोलमजुरी करणाºयांनी जागांचा ताबा घेतला आहे. संबंधितांकडून त्याठिकाणीच सारे विधी केले जात असल्याने अस्वच्छतेला निमंत्रण मिळते आहे. यापूर्वी, महापालिकेने पोलिसांच्या मदतीने दोन ते तीन वेळा सदर नागरिकांना तेथून हटविण्याचा प्रयत्न केला परंतु, एकदा कारवाई झाली की पुन्हा ठाण मांडून बसण्याचा प्रकार वारंवार घडताना दिसून येत आहे. संबंधित नागरिकांची छोटी मुले रस्त्यावर येत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
निवारागृहे ओस
महापालिकेने बेघरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात दोन ठिकाणी निवारागृहे उभारली आहेत. परंतु, सदर निवारागृहे ओस पडलेली आहेत. उड्डाणपुलाखाली अतिक्रमण करणाºया बेघरांना निवारागृहात थांबण्याची सूचना देऊनही त्याठिकाणी नागरिक जात नाहीत. महापालिकेने शहरात सहा ठिकाणी निवारागृहे प्रस्तावित केली होती. त्यातील दोन कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु, त्यांचाही उपयोग होताना दिसून येत नाही. महापालिकेन तपोवनातील साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या जागेत ११ वर्षांच्या कालावधीसाठी बेघरांसाठी निवारागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु, सिंहस्थासाठी आरक्षित जागा असल्याने नगररचना विभागाने त्यास हरकत घेतली. त्यामुळे, तेथील निवारागृहाचाही प्रश्न भिजत पडला आहे.
उड्डाणपुलालगत वाहनतळ
मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलालगत दुभाजकांवर अनधिकृतपणे वाहनतळे उभी राहिली आहेत. या रस्त्यावरील काही हॉटेल्स, गॅरेजचालकांकडून या जागांचा वापर अनधिकृतपणे वाहनतळ म्हणून केला जात आहे. काही नादुरुस्त वाहनेही त्याठिकाणी ठेवून देण्यात आलेली आहेत. याशिवाय, पाथर्डी फाटालगत उड्डाणपुलाखालीही वाहने उभी करून दिली जात आहेत.
कचरा, घाणीचे साम्राज्य
जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरही नाना-नानी गार्डन बनविण्याचा उद्देश होता परंतु, याठिकाणीही मोलमजुरी करणाºया नागरिकांकडून पाल टाकले जात आहेत. संबंधितांकडून तेथेच घाण-कचरा टाकून दिला जात असल्याने अस्वच्छता निर्माण होते. लगतच जिल्हा शासकीय रुग्णालय आहे परंतु, रुग्णालयाकडूनही त्याबाबत कार्यवाही केली जात नाही. महामार्गावरील उड्डाणपुलाखालील इंदिरानगरकडे जाणारा बोगदा एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनधारकांना मुंबई नाक्याला वळसा घालून इंदिरानगरकडे यावे लागते. वाहतुकीच्या दृष्टीने पोलिसांनी ही योजना केली असली तरी, वाहनधारकांनी मध्येच दुभाजक फोडून मार्ग काढले आहेत. मधूनच वाहने घुसत असल्याने अपघाताच्याही घटना घडतात. उड्डाणपुलालगतच्या समांतर रस्त्यांवरही अवजड वाहने उभी राहताना दिसून येत असून यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.