देवदर्शनाला जाताना बाप-लेकीचा अंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 06:37 PM2020-07-30T18:37:17+5:302020-07-30T18:38:18+5:30
ताहाराबाद : अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या ताहाराबाद येथील बाप-लेकीवर काळाने घाला घातल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. सदर घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी सात वाजेच्या सुमारास वाकी नाल्याच्या वळणावर घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ताहाराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादास महाजन (३५) हे पत्नी नीलम (३०) व कन्या आर्या उर्फ किट्टू या सात वर्षाच्या चिमुकलीसह दुचाकीने अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी जात होते. श्रावण महिन्यातील दर गुरुवारी बाबांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने जाणारे महाजन आज गुरुवारचे औचित्य साधून दर्शनासाठी निघाले होते. त्याच सुमारास अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्ण घेऊन सटाण्याकडे भरधाव वेगाने जात होती. वाकी नाल्याच्या वळणावर वाहनचालकाकडून रुग्णवाहिका नियंत्रित न झाल्याने त्यांनी महाजन यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर इतरत्र फेकले गेले. या अपघातात राहुल महाजन व त्यांची कन्या आर्या यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच अंत झाला, तर पत्नी नीलम या गंभीर जखमी झाल्या आहेत. दावल मलिक बाबांसाठी नेत असलेल्या प्रसादातील मेथीची भाजी, भाकर आणि गुळ रस्त्यावर पसरला होता. याप्रकरणी अधिक तपास जायखेडा पोलीस करीत आहेत.
गुरुवारीच घडली दुसरी घटना
अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबा यांचा दर गुरुवारी उत्सव असतो. यानिमित्त विविध भागातील हजारो भाविक या उत्सवाला हजेरी लावत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यापूर्वी गुरुवारच्याच दिवशी वाकी नाला परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या भाऊसाहेब बापूराव मानकर यांना वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाजन कुटुंबातील बाप-लेकीचा अपघाती मृत्यू झाला तोही गुरुवारच्याच दिवशी. या दुर्दैवी योगायोगाची भाविकांनी आठवण करुन दिली.
नाला बनला अपघाती क्षेत्र
वाकी नाल्यावर जीवघेणे वळण असून याच भागात शाळा, गॅसचे गोडावूनही आहे. तसेच शेतकऱ्यांचीही लगबग मोठ्या प्रमाणात सुरु असते. वाहनांच्या वर्दळीमुळे याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत असल्याने हा नाला परिसराची अपघाती क्षेत्र म्हणूनही नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. रस्त्याची अवस्थाही बिकट असल्याने संबंधित विभागाने नाल्याची उंची कमी करावी अशी मागणी केली जात आहे.