प्रचाराचा संपला गलबला, आता मताधिकार बजावू चला!
By किरण अग्रवाल | Published: April 28, 2019 01:00 AM2019-04-28T01:00:20+5:302019-04-28T01:07:05+5:30
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी व त्यांच्या नेत्यांनी प्रचाराद्वारे राजकीय पृष्ठभूमी तयार करून झाली, आता वेळ आली आहे, विचार करून योग्य निर्णय घेण्याची. राज्यात इतरत्र अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे, तसे आपल्याकडे होऊ नये. परंपरेप्रमाणे मतदार यादीतील घोळ पुढे आले आहेत, पण त्यावर मात करीत हा टक्का वाढायला हवा.
सारांश
निवडणुकीच्या प्रचाराचा गलबला आता थंडावल्याने मतदारांच्या ‘मत’निश्चितीची प्रक्रिया घडून येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. उद्या मतदानाला जाण्यापूर्वी हा निर्णय व्हायचा आहे. काहींचा तो यापूर्वीच झालाही असेल; परंतु झालेल्या निर्णयावर पुनर्विचाराचीही ही संधी म्हणता यावी. कारण, आपले हे ‘मत’च आपल्याला हवे ते आपले सरकार बनविण्याच्या कामी येणार असून, लोकशाहीचे बळकटीकरणही त्यातूनच घडून येणार आहे. म्हणूनच, आता वेळ आली आहे मताधिकार बजावण्याची.
महाराष्ट्रातील शेवटच्या चौथ्या चरणातील मतदान सोमवारी, २९ रोजी होत असून, त्यासाठीची सारी प्रशासकीय सज्जता झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी आणि येथील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदानही उद्या होणार असून, तेथील जाहीर प्रचार काल थंडावला. खरे तर यंदा प्रारंभीच्या काळात प्रचाराचा धुरळा फारसा उडालेला दिसलाच नव्हता. अखेरच्या टप्प्यात म्हणजे राज्यातील मतदानाचे पहिले तीन टप्पे पार पडल्यानंतर खऱ्याअर्थाने येथील जाहीर प्रचाराने गती घेतली आणि निवडणुकीचा माहौल तयार झाला. यात ‘आघाडी’च्या उमेदवारांसाठी शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदींनी, तर ‘युती’करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी नेत्यांनी सभा घेतल्या. वंचित बहुजन आघाडीही या जागांवर लढत असल्याने जिल्ह्यात असदुद्दीन ओवैसी व प्रकाश आंबेडकर यांच्या, तर दिंडोरीत माकपही रिंगणात असल्याने सीताराम येचुरी, अशोक ढवळे आदींच्या सभा झाल्या. शिवाय ‘मनसे’चे उमेदवार निवडणूक रिंगणात नसले तरी राज ठाकरे यांनीही नाशकात त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ग्रॅण्ड फिनाले केला. त्यामुळे प्रचाराच्या उत्तरार्धात चांगलाच गलबला उडून गेलेला दिसून आला.
पक्ष भलेही भिन्न असो, त्यांची विचारधारा वा प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे असोत; पण या साºया नेत्यांनी आपापले पक्ष व उमेदवारांसाठी अनुकूलता निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता निर्णय मतदारराजाला घ्यायचा आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा तर पूर्ण विचाराअंती हा निर्णय घेऊन प्रत्येकाला आपला मताधिकार बजावायचा आहे. हे लोक‘मत’च आपल्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणारे सरकार देणार आहे. म्हणून आता त्याबद्दल, म्हणजे मतदानाबद्दल कुचराई होऊ नये ही अपेक्षा आहे. येथे हा कुचराईचा उल्लेख यासाठी की, अधिकतर ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे. चारच दिवसांपूर्वी तिसºया चरणातील मतदान जिथे झाले, त्या १४ मतदारसंघांपैकी आपल्या लगतच्या जळगाव, रावेर, पुण्यासह ११ ठिकाणी गेल्यावेळेपेक्षा मतदान कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अर्थात, कडाक्याच्या उन्हाचा तडाखा असल्यामुळेही हा फटका बसला; परंतु त्या कारणानेही घरात बसून न राहता, किंवा त्यामुळे घसरणाºया टक्क्यावर मात करण्याकरिता मतदान वाढणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात चाळिशीच्या आतील मतदारांची संख्या ४५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यात २०१४ पेक्षा यंदा नवमतदारही वाढले आहेत. ही ‘तरुणाई’ मतदानाला सरसावली तर टक्का नक्कीच वाढेल. महिला मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. ही नारीशक्तीही आता स्वत: विचार करून निर्णय घेऊ लागली आहे. त्यामुळे यंदा टक्का वाढणे अपेक्षित आहे. इतिहासात डोकावले तर नाशकात १९६७मध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक ६५.७९ टक्के, तर तत्कालीन मालेगाव मतदारसंघात १९६२ मध्ये सर्वाधिक ६६.७६ टक्के मतदान झालेले दिसून येते. यंदा हे ‘रेकॉर्ड’ मोडून मतदानाच्या वाढत्या टक्क्याचा नवा उच्चांक स्थापित करणे जिल्हावासीयांच्या हाती आहे. अर्थात, एकीकडे अशा अपेक्षा असताना दुसरीकडे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचेही पुढे आले आहे. अनेक नावे गायब होणे, नावे सदोष असणे, फोटो चुकीचे लागणे असे नेहमीचे प्रकार घडले आहेत. मतदार चिठ्ठ्या मतदारापर्यंत वेळेत पोहोचणे अपेक्षित असताना पत्तेच चुकीचे असल्याने तेही पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही. याचा नाही म्हटले तरी मतदानावर परिणाम होण्याची भीती साधार ठरून गेली आहे. पण, आता या प्रशासकीय त्रुटींवर बोट न ठेवता त्यासंबंधीच्या अडचणींवर मात करून मतदारांनी मतदानासाठी सज्ज व्हावे, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. कोणत्या का कारणाने होईना, मतदानाचा टक्का घसरू न देता तो उलट वाढावा इतकेच यानिमित्ताने.