नाशकात अखेर पीजी इन्टिट्यूटला मुहूर्त
By admin | Published: December 22, 2016 12:33 AM2016-12-22T00:33:44+5:302016-12-22T00:34:04+5:30
१५ दिवसांत होणार सोपस्कार पूर्ण : संशोधनाला मिळणार चालना; नाशिककरांकडून स्वागत
नाशिक : बहुप्रतीक्षेत असलेल्या पीजी इन्स्टिट्यूटला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या १५ दिवसांत सर्वसोपस्कार पूर्ण होऊन नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात पीजी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला चालना मिळणार असून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवादेखील मिळणार आहे. मंगळवार दि. २० रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. नाशिकमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पी.जी. इन्स्टिट्यूट तर जळगावमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसात या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळासमोर ठेवले जाणार आहेत. मंजुरीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नाशिक विभागात दुसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील. सध्या धुळे येथे एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहे.
जळगावमध्ये पदवी (एमबीबीएस) वैद्यकीय महाविद्यालय तर नाशिकमध्ये पी.जी. म्हणजेच पदव्युत्तर पदवी (एमडी, एमएस) अभ्यासक्रमाचे इन्स्टिट्यूट स्थापन होणार असल्यामुळे विभागाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला चालना मिळणार आहे.
नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी २० ते २५ वर्षांपासूनची आहे. विशेषत: आयएमए ही डॉक्टरांची संघटना याबाबत आग्रही आहे. राज्यातील इतर विभागात एकापेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये असताना नाशिक विभागात केवळ धुळे येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. दुसरे शासकीय महाविद्यालय नाशिकमध्ये असावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली; मात्र आता धुळे लगतच्याच जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे; तर नाशिकमध्ये पीजी. इन्स्टिट्यूट होणार असल्यामुळे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय मिळण्याचा मार्गही सोपा होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत केले जात आहे.