एप्रिलअखेर धरणांमध्ये फक्त २८ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:03 AM2018-05-01T02:03:13+5:302018-05-01T02:03:13+5:30
पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात मार्चअखेरपासून उष्णतेची लाट आली असून, पाऱ्याने सरासरी ४० अंश सेल्सिअस तपमान कायम ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या व जनावरांसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी सिंचन, बिगर सिंचनासाठी धरणांमधून आवर्तने सोडण्यात आल्याने एप्रिल अखेर धरणांमध्ये २८ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. महिनाभरात जवळपास १६ टक्के धरणातील पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ४४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर खुद्द गंगापूर धरणात ४२ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ४८ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात २० टक्के तर पालखेड धरण समूहात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर, देवळा, नांदगाव या सहा तालुक्यांत ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही शिवाय प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाही यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
अपयश लपविण्याचा प्रकार
प्रशासन व्यवस्थेने जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा व त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा केला असला तरी, तो फोल ठरला आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली असताना निव्वळ जलयुक्त शिवार योजनेचा फोलपणा उघडकीस येऊ नये म्हणून टॅँकर सुरू करण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार केली जात आहे.