शेवटी पोलिसांना घाबरायचं ते सामान्यांनीच!
By Admin | Published: May 20, 2014 01:00 AM2014-05-20T01:00:47+5:302014-05-20T01:00:47+5:30
नाशिक : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय... शेवटी ब्रीदवाक्य पोलीस दलाचे असले म्हणून काय झाले, ते प्रत्यक्षात का आणायचे? दंडुका हाती असलेल्या पोलिसांना घाबरतात ते सर्वसामान्य नागरिकच.
नाशिक : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय... शेवटी ब्रीदवाक्य पोलीस दलाचे असले म्हणून काय झाले, ते प्रत्यक्षात का आणायचे? दंडुका हाती असलेल्या पोलिसांना घाबरतात ते सर्वसामान्य नागरिकच. गुंड थोडीच घाबरतात? (तसे असते तर शहरात गुन्हेगारी केव्हाच अस्तंगत झाली असती.) मग धाक जमवायचा म्हणून कुणा सर्वसामान्य व्यक्तीच्या कानशिलात लगावली तर काय बिघडलं? पोलिसांना बघून असंच तर चळचळा सर्वसामान्यांनीच भयभीत झाले पाहिजे ना... नाशिक पोलिसांच्या एकूणच या प्रवृत्तीला साजेशा घटना रोजच घडत असतील तर कोणी कोणी आणि कोणाकडे दाद मागावी? खूपच झाले तर पोलिसांनी मोठ्या मनाने (?) अशा पीडितीला ‘सॉरी’ म्हणून टाकले की त्या सामान्य व्यक्तीला तितकेच समाधान आणि पोलिसांचे परिमार्जन. घटना तशी फार जुनी नाही. गेल्याच आठवड्यातील आहे. भीम पगारे नामक एका कुख्याताचा भर चौकात खून झाला आणि दुसर्या दिवशी सार्या शहरावर तणाव निर्माण झाला. पोलिसांचा धाकच राहिला नाही असे जो तो म्हणू लागला. मग काय, पोलिसांनी धाकच दाखवतो तुम्हाला म्हणत चौकाचौकांत फेर्या सुरू केल्या. सिडकोच्या गल्लीबोळातून देखील एक पोलीस उपआयुक्त कर्मचार्यांंचा फौजफाटा समवेत घेऊन दांडुके आपटत फिरू लागले. जनतेचे ‘स्वामी’च ते, कोणाला काय विचारतील सांगता येत नाही; परंतु जेव्हा पोलीस काही विचारतील तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अदबीने वाकूनच बोलले पाहिजे.. आवाज चढविला तर अशी जुर्रत करणार्यांना क्षमा नाही. असो. महाराणा प्रताप चौकात एका इमारतीच्या खाली एक सफारी मोटार उभी होती आणि नजीकच दोन-तीन तरुण मुलं बोलत उभी होती. उपआयुक्तांनी त्यांना फटकारण्यासाठी उगाचंच ही मोटार कोणाची, इथे का उभी केली, असा प्रश्न केला. ती आमच्या बॉसची मोटार आहे, असे त्या युवकांनी सांगितल्यानंतर इथं का उभी केली म्हणून विचारणा केली. त्या युवकांनी याच इमारतीत आॅफिस असल्याने ती मोटार इथेच उभी असते, असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांचा पारा चढलेलाच. मोटार येथून हटवा असे ते थेट आदेशीतच करू लागले. पोलीस कोणाची तरी कानउपटणी करीत असल्याचे बघून चौकात बघ्यांची गर्दी जमली. आणि त्याचवेळी पोलीस ज्या युवकांशी संवाद (?) साधत होते, त्यातील एकाने आपल्या बॉसची महती सांगण्यास सुरुवात केली आणि उपआयुक्तांना जो संताप आला की त्यांनी त्या तरुणाच्या श्रीमुखातच भडकावली. आपली चुक काय, पोलिसांना कोणा मोठ्या व्यक्तीची ओळख सांगणे हे गुन्हा आहे काय, असा प्रश्न तो तरुण करू लागला. यामुळे गर्दी आणखीनच वाढली. त्या तरुणानेदेखील अंगावर हात टाकू नका असे सांगितले. परंतु गर्दीमुळे उपआयुक्तांना आधीच हुरूप आला. त्याच वेळी त्या युवकाच्या बॉसने तेथे येऊन मध्यस्थी केली आणि तातपुरते प्रकरण थांबले. मात्र त्या युवकाने अपमानीत होतानाही या प्रकरणी वरिष्ठांकडे दाद मागू असे संतापाने सांगितले. सायंकाळ झाली. उपआयुक्त महोदय शांत झाले. मग त्यांनी त्या युवकाचा भ्रमणध्वनी शोधून संपर्क साधला आणि सॉरी म्हटले. संतापाच्या भरात होऊन जाते, असे सांगितले. परंतु त्याचबरोबर घडल्या प्रकरणाची वाच्यता करू नको, असेही बजावले. त्यामुळे उपआयुक्तांच्या संपर्काचा अट्टहास हा क्षमापनेसाठी नव्हताच, तर घडल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये यासाठीच खटाटोप होता. गुंडांच्या मुसक्या आवळण्याची धमक नाही आणि कोणा सर्वसामान्यांवर मात्र धाक जमविण्याची अशीही पद्धत... यातून काय साध्य होणार? सर्वसामान्य नागरिक पोलिसांना नायक समजतील की खलनायक? आणि पुन्हा सर्वसामान्य अशा घटनेने पोलिसांना घाबरतील, परंतु गुन्हेगारांचे काय? ते शहरात थैमान घालतच राहतील. (प्रतिनिधी)