ऊर्जा संवर्धन जनजागृती ग्राहकांच्याच हिताची - जनवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:05 AM2019-12-22T01:05:40+5:302019-12-22T01:06:14+5:30
सध्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून, ऊर्जा बचतीविषयी ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. वीज ही प्राथमिक गरज आहेच, याबरोबरच नैसर्गिक साधन सामुग्री मर्यादित असल्यामुळे विजेची मर्यादा लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांना वीज पुरविणे हे महावितरणचे काम आहेच, परंतु याबरोबरच ग्राहकांमध्ये ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कामदेखील महत्त्वाचे असल्याने त्याविषयी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंंह जनवीर यांच्याशी साधलेला संवाद...
ऊर्जा संवर्धनाच्या निमित्ताने वीजबचतीबद्दल काय संदेश देता येईल?
आज वीज ही प्राथमिक गरज असून, नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादित असून, कोळसा कमी प्रमाणात शिल्लक आहे. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापर होत असलेली विद्युत ऊर्जेची निर्मितीदेखील कोळशापासून केली जाते. ऊर्जेच्या अव्याहतपणे होत असलेल्या वापरामुळे ऊर्जेचा तुटवडा भासू शकतो तसेच यामुळे ग्लोबल वार्मिंगसारख्या गंभीर समस्यांना जगास सामोरे जाण्यासाठी ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करून अनावश्यक वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक घटकाने जनसमुदाय आणि विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा बचतीचे महत्त्व प्रसारित केले पाहिजे.
ऊर्जा संवर्धन जनजागृतीसाठी महावितरण कसे कामकाज करते?
महावितरण वर्षभर ग्राहकांशी संवाद साधताना कार्यालयातून, वीजबचती संदर्भात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्र मामधून जागरूकता निर्माण करीत असते. याचबरोबर वृत्तपत्राच्या माध्यमातून यासंदर्भात सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असते. याशिवाय विविध प्रकारचे पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून ग्राहकांना वीज साक्षर करण्याचा आणि काळजी घेण्यासाठीही प्रबोधन केले जाते.
वीजबचतीसाठी काय केले पाहिजे असे आपणास वाटते?
आज आपल्या दैनंदिन आयुष्यातली अर्ध्याहून अधिक कामे ही विजेवरच अवलंबून असतात. विजेचा वापर गरजेपुरता करून अनावश्यक वापर टाळला पाहिजे, बचतीसाठी खूप मोठे असे काही काम करावे लागत नाही किंवा खूप मोठा त्यागही करावा लागत नाही. वीजबचतीचे काही साधारण उपाय केले की वीज सहज वाचू शकते. दैनंदिन सवयीमुळे काही गुंतवणूक न करता एकूण वीज वापराच्या ५ ते १० टक्के विजेची बचत नक्कीच करता येऊ शकते.
स्वत:च्या वीज वापराचा हिशेब आणि नियोजन केल्यास वापरलेल्या विजेचे बिल नियोजनाप्रमाणे येण्यास मदत होईल. तसेच ज्या उपकरणाचा आपण वापर करत नाही ते बंद करण्याची आपसूकच सवय लागेल. शेवटी एक युनिटची बचत म्हणजेच दोन युनिटची निर्मिती असते.