शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा ‘उधळण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2015 10:42 PM2015-12-14T22:42:11+5:302015-12-14T23:52:30+5:30

ऊर्जा संवर्धनाला हरताळ : एक-एक कण ऊर्जा वाचविण्याचा पडला विसर; कोठे पंख्यांची घरघर, तर कोठे दिव्यांचा लखलखाट

Energy Offices in Government Offices | शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा ‘उधळण’

शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा ‘उधळण’

Next

अझहर शेख, नाशिक
‘एक-एक कण ऊर्जा वाचवूया, भविष्याची ऊर्जा आजच साठवूया...’ असा प्रबोधनात्मक नारा राज्य शासनासह महाऊर्जा विभागाकडून बुलंद केला जात आहे; मात्र शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये याउलट चित्र बघावयास मिळाले. कार्यालयांमधील आवारात एकापेक्षा अधिक ट्यूबलाईटचा लखलखाट, तर ऐन हिवाळ्यात जेवणाच्या वेळेतही पंख्यांची घरघर सर्रासपणे सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही कार्यालयांमधील अधिकाऱ्यांची रिकामी दालनेही दिव्यांच्या लखलखाटाने उजळलेली होती. एकूणच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनालाच शासकीय कार्यालयांकडून विजेची उधळण करून हरताळ फासला गेला.
दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो, तर वीस डिसेंबरपर्यंत ‘ऊर्जा बचत व जनजागृती सप्ताह’ पाळला जातो. यानिमित्ताने आज (दि.१४) महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद भवन, आदिवासी विकास भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वच कार्यालयांना भेटी दिल्या असता या सर्वच कार्यालयांच्या गावी ऊर्जा संवर्धन दिन नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिकेच्या जनसंपर्क कक्षामध्ये कोणीही नसतानादेखील सर्वच दिवे सुरू असल्यामुळे कक्ष ‘प्रकाश’मान असल्याचे सकाळी आढळून आले. तसेच कामगार सेनेच्या कक्षाबरोबरच विरोधी पक्षनेत्यांच्या दालनातही विजेची उधळपट्टी पहावयास मिळाली. तसेच अभियंत्यांच्या कार्यालयांमधील मोकळ्या जागेत भिंतींच्या खिडकीतून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत असतानाही सर्व ‘दिवे’ लावलेले होते हे विशेष! जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काही कक्षांमध्ये अनावश्यकरीत्या विजेची उधळण होत असल्याचे बघावयास मिळाले. येथील वनहक्क कायदा कक्षामध्ये असलेले सर्वच दिवे प्रकाशमान होते. वास्तविक बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याची गरज किमान दिवसातरी पडायला नको; मात्र येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हा आपत्ती विभागप्रमुखांच्या कार्यालयातही कोणी नसतानाही त्यांच्या खुर्चीवरील दिवा प्रकाशमान असल्यामुळे कक्ष उजळला होता. जिल्हा परिषदेमध्येही विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील जागेत असलेले सर्वच दिवे लागलेले होते. विशेष म्हणजे यावेळी एकही पदाधिकारी दालनामध्ये नव्हता व अभ्यागतही त्यांच्याकडे फिरकलेले नव्हते तरीदेखील विजेची उधळण सुरूच होती. आदिवासी विकास भवनामध्ये प्रवेश करताच स्वागत कक्षावरील दिवे चालू होते. पहिल्या मजल्यावरील प्रशासन विभागाच्या सर्व खिडक्यांमधून आतमध्ये हवा-प्रकाश खेळता असतानाही दिव्यांचा लखलखाट होता.

मागणी अधिक निर्मिती कमी
    ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत निर्मिती अपुरी पडत आहे. २00१ साली भारताच्या प्रतिव्यक्तीमागे ३७४ किलो वॅट ऊर्जेचा वापर दरवर्षी होत होता; मात्र सध्या ६0८ किलो वॅट ऊर्जा वापरली जात आहे. २0१२ पर्यंत जाणकारांच्या मते १000 किलो वॅट ऊर्जेच्या वापराची आवश्यकता असल्याचा अंदाज होता. त्यामुळे ऊर्जेची निर्मिती वाढविण्यावर भर दिला जात आहे. एकूणच दिवसेंदिवस ऊर्जेची मागणी वाढत असून, त्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्वच उत्पादन क्षेत्रांसाठी ऊर्जेची गरज असून, त्यासाठी ऊर्जेची असणारी नैसर्गिक संसाधने र्मयादित स्वरूपाची आहे. त्यामुळे सौर ऊ र्जेच्या वापराचा विचार करणे गरजेचे असून, विजेची बचत काळाची गरज आहे, हे समजून अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

जनजागृतीचा विसर, विजेचा अपव्यय

प्रसारमाध्यमांद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या औचित्यावर राज्य व केंद्र शासनामार्फत जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जात असताना शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये मात्र विजेचा अपव्ययच बघावयास मिळाला. ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताहच्या औचित्यावर एकाही कार्यालयामध्ये जनजागृतीपर फलक लावल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ‘ऊ र्जा संवर्धन दिन’ शासकीय कार्यालयांच्या उंबरठय़ावरच पोहचलेला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.

Web Title: Energy Offices in Government Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.