मालेगाव बाह्य मतदार-संघात अभियंता-डॉक्टरमध्ये काट्याची टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:16 AM2019-10-08T01:16:21+5:302019-10-08T01:16:44+5:30
मालेगाव बाह्य मतदार-संघात माघारीच्या दिवशी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
मालेगाव : मालेगाव बाह्य मतदार-संघात माघारीच्या दिवशी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात ९ पैकी ६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे (अभियंता) व कॉँग्रेस - राष्टवादी कॉँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष तुषार शेवाळे (डॉक्टर) या दोघा उच्चशिक्षित व समाजाशी नाळ जुळलेल्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघातून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले व यंदा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले संदीप पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांच्यासह मो. इस्माईल जुम्मन यांनी माघार घेतली आहे. परिणामी बाह्य मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यातील सहा उमेदवार सेनेचे भुसे व कॉँग्रेसचे शेवाळे यांना डोकेदुखी ठरणार आहे. बाह्य मतदारसंघात कॉँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे व शिवसेनेकडून दादा भुसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेतर्फे दादा भुसे, भाजपचे पवन यशवंत ठाकरे, कॉँग्रेसचे डॉ. राजेंद्र ठाकरे, मनसेचे संदीप पाटील,
बसपाचे व्यंकट कचवे तर अपक्ष म्हणून कैलास पवार, अॅड. चंद्रशेखर देवरे, निंबा माळी, फहीम अहमद महेमुदल हसन निवडणूक रिंगणात उतरले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे व भाजपचे पवन ठाकरे यांच्यात सरळ लढत झाली होती. दादा भुसे यांना ८२ हजार ९३ मते मिळाली होती तर भाजपचे ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसचे सुनील गायकवाड यांना ३४ हजार ११७ मते मिळाली होती. या चुरशीच्या लढतीत भुसे यांनी मताधिक्य खेचत विजयाची हॅट्ट्रिक केली होती.
यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे व शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. डॉक्टर व अभियंत्यामध्ये सरळ सामना होणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष मालेगाव बाह्य मतदारसंघाकडे लागून आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात ३ लाख ३९ हजार ७१ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७८ हजार ५५४ पुरुष तर १ लाख ६० हजार ५१४ महिला मतदार आहेत.
३ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. २०१४च्या निवडणुकीत ३ लाख ३६ हजार १९७ मतदार होते. त्यात १ लाख ७७ हजार ४४९ पुरुष, तर १ लाख ५८ हजार ७४७ महिला मतदारांचा समावेश होता. गेल्या वेळी ५२ टक्के मतदार झाले होते.
रिंगणातील उमेदवार...
दादा भुसे (शिवसेना), डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस), आनंद लक्ष्मण आढाव (बसपा), अबु गफार मो. इस्माईल (अपक्ष), अब्दुरशीद मुह इजहार (अपक्ष), कमालुद्दीन रियासतअली (अपक्ष), काशीनाथ लखा सोनवणे (अपक्ष), प्रशांत अशोक जाधव (अपक्ष), मच्छिंद्र गोविंद शिर्के (अपक्ष).
२०१४ मध्ये होते ९ उमेदवार । यंदा आहेत एकूण ९ उमेदवार