सिन्नर पंचायत समितीचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 12:05 AM2022-01-09T00:05:13+5:302022-01-09T00:12:11+5:30
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता गौरव सूर्यकांत गवळी यांना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सिन्नर तालुक्यातील कासारवाडी ग्रामपंचायतअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्लांट बसवण्याचे कंत्राट घेऊन सदरचे काम पूर्ण केले होते. सदर कामाची मोजमाप पुस्तिका भरून केलेल्या कामाचे देयक (बिल) काढून देण्यासाठी मदत करण्याकरिता कनिष्ठ अभियंता गवळी यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पंधरा हजारांपैकी पहिला टप्पा १० हजार रुपये लाच स्वीकारताना गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सापळा पथकातील पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे, पोलीस नाईक अजय गरुड, परशुराम जाधव आदींनी सापळा रचून कामगिरी यशस्वी केली.