गणित, भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी शिक्षण कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:30+5:302021-03-17T04:15:30+5:30

नाशिक : गणित आणि भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकीचा पाया असून, या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नाही. ...

Engineering education is difficult without mathematics and physics | गणित, भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी शिक्षण कठीण

गणित, भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी शिक्षण कठीण

Next

नाशिक : गणित आणि भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकीचा पाया असून, या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नाही. या निर्णयामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांमध्ये वाढही होण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात उलट प्रतिक्रिया उमटून शिक्षणक्षेत्रात संभ्रमाची स्थिती निर्माण होईल, असे मत तज्ज्ञांकरून व्यक्त होत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची भीती दूर करण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु, अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र व गणित हे विषय न घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळत नाहीत. त्यामुळे या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.

अभियांत्रिकी पदवीचा कालावधी वाढण्याची भीती

अभियांत्रिकी प्रवेशासाठी नियमावलीत बदल केले जाणार असतील तर प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का? तसेच ही परीक्षा घेण्यात आली तर त्यातूनही गणित व भौतिकशास्त्र विषयांसदर्भातील प्रश्न वगळण्यात येतील का, असा प्रश्न विद्यार्थी आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शकांना पडला आहे. गणित व भौतिकशास्त्र विषयांची उणीव भरून काढण्यासाठी पदवीदरम्यान, ब्रीज कोर्सचा पर्याय निवडावा लागू शकतो, मात्र या कोर्समु‌ळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी पदवी शिक्षणाचा कालावधी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोट-

अकरावी-बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास झाल्याचे गृहीत धरूनच

विद्यापीठाकडून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला जातो. मात्र, या पुढील काळात विद्यापीठाला अभ्यासक्रमाबाबत वेगळा विचार करायला लागेल.

- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

--

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित विषय आवश्यकच आहे. त्यामुळे गणित, भौतिकशास्त्राचा अभ्यास न करणारे विद्यार्थी महाविद्यालयात आले तर प्रथमत: त्यांना या विषयांच्या मूलभूत संकल्पना शिकवाव्या लागतील, असे मत अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

--

गणित आणि भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश देणे चुकीचे होईल. शिक्षणक्षेत्रात आपण आणखी किती तडजोड करणार? अर्थशास्त्र विषयासह इतर विद्या शाखांमधील काही विषयांसाठी गणित अनिवार्यच आहे. या निर्णयामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित होईल, असे मत अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत एका अभियंत्याने व्यक्त केले आहे.

--गणित, भौतिकवास्त्राशिवाय अभियांत्रिकी हा संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे. विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजल्याशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य आहे. तसेच ब्रीज कोर्स केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. गेल्या दहा वर्षात अभियांत्रिकी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आयटी किंवा स्पर्धा परीक्षांकडे वळले. त्यामुळे या निर्णयाने अभियांत्रिकीच्या प्रवेशात वाढ होणार नसल्याचे मत अभियांत्रिकी शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या -१९

एकूण जागा- ७५३०

एकूण प्रवेश -३२३९

रिक्त जागा -४२९१

प्रवेशाचे प्रमाण- ४३ टक्के

Web Title: Engineering education is difficult without mathematics and physics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.