अभियांत्रिकीचा निकाल क्रेडिट पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:50 AM2018-07-15T00:50:55+5:302018-07-15T00:52:07+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यापासून अपात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र टक्केवारी पद्धतीनेच देण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम राहिले आहे.

विद्यापीठाच्या २००८ आणि २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे टक्केवारी पद्धतीने लावण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेशापासून वंचित राहावे लागणार होते. त्यामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालयात आंदोलन केले. यात अभाविप, एनएसयुआय, मनविसेसह विद्यार्थी न्याय मंचच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने या प्रश्नाला राजकीय स्वरूप प्राप्त होत असल्याचे पाहून विद्यापीठाने तत्काळ निकालात बदल करण्याची तयारी दाखवून अभियांत्रिकी शाखेचे सर्व निकाल २०१५ च्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे क्रेडिट पद्धतीनुसार घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळाची बैठक झाली. याबैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीने
तीनही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी एकच शिक्षण घेतले तसेच, त्यांनी सारखीच परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीने लावला जावा, अशी उपरती विद्यापीठाच्या अधिकार मंडळाला परीक्षेचा निकाल टक्केवारी पद्धतीने जाहीर केल्यानंतर झाली. त्यामुळे या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार २००८ व २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे निकाल २०१५ पॅटर्ननुसार तयार केले जाणार आहे. त्यांची गुणपत्रके मात्र टक्केवारीनुसारच देण्यात येतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.