महापालिकेत टाळे ठोकून अभियंत्यांना डांबले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 01:44 AM2021-09-18T01:44:16+5:302021-09-18T01:48:32+5:30
नाशिक : नाशिक रोड विभागातील खराब पथदीप पोल बदलण्यासंदर्भातील कामाची चौकशी पुर्ण होत नसल्याने यांसदर्भातील तक्रारींची प्रशासन दखलही घेत ...
नाशिक : नाशिक रोड विभागातील खराब पथदीप पोल बदलण्यासंदर्भातील कामाची चौकशी पुर्ण होत नसल्याने यांसदर्भातील तक्रारींची प्रशासन दखलही घेत नसल्याने भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आक्रमक भूमिका घेत राजीव गांधी भवनातील मुख्यालयातील विद्युत विभागाला टाळे ठोकून अभियंत्यांना डांबून ठेवले. शहाणे यांनी मनपाच्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांना शुक्रवारी (दि.१७) कार्यालयातच कोंडले. या प्रकारानंतर एकच धावपळ उडाली आणि अतिरिक्त आयुक्तांनी मध्यस्थी करून, कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्याचे अश्वासन दिल्यानंतर अखेरीस अनलॉक करण्यात आले आणि अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता वनमाळी यांची सुटका झाली. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असून, त्यांचे पक्षाचे नगरसेवक आंदोलन करीत असल्याने, हा पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
नाशिक राेड येथील पेाल खराब पोल बदलण्याचे काम विद्युत विभागाने एका ठेकेदाराला दिला असून, त्यावर शहाणे यांचा आक्षेप होता. नाशिक रोड विभागातील अभियंता आणि ठेकेदाराने हे काम संबंधितांना मिळाल्याचा आरोप करीत शहाणे यांनी या कामास आक्षेप घेतला होता व चौकशी करून अहवाल देण्याची मागणी केली होती.
या संदर्भात शहाणे यांनी तीन वेळा याबाबत धर्माधिकारी व वनमाळी यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, पाच कोटींचे काम असून, आतापर्यंत ठेकेदाराला ७४ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे शहाणे यांनी शुक्रवारी (दि.१७) मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना कोंडले. ही माहिती मिळताच, भाजप पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहाणे यांची समजूत घातल्यानंतर टाळे काढण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना हा प्रकार कळाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळी येऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देण्याचे आदेश दिल्यानंतर टाळे काढण्यात आले.
इन्फो...
पुन्हा असे केल्यास गुन्हा दाखल करणार
या टाळे ठोकण्याच्या आंदोलनानंतर नगरसेवक शहाणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. टाळे ठोकण्याच्या प्रकारानंतर आयुक्त आणि शहाणे यांच्यात चर्चाही झाली. भविष्यात असे प्रकार केल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असे शहाणे यांना बजावल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
छायाचित्र आर फोटोवर