भूखंड घोळात अभियंत्यांची साक्ष नोंदवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:58 AM2019-01-29T00:58:42+5:302019-01-29T00:58:57+5:30
महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडापोटी २१ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा विषय सध्या गाजत आहे. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी अधीक्षक अभियंता आणि अतिरिक्तआयुक्तांचा समावेश असलेली द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने नगररचना विभागाकडून कागदपत्रे मागविण्यात आली असून, त्याचा अभ्यास सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेची ही समिती प्रक्रियेचा योग्य की अयोग्य याचा तपास करणार आहे. त्यात काही अभियंत्यांनी महासभेत, स्थायी समितीत किंवा खासगी स्तरावर दिलेली माहितीदेखील तपासली जात आहे.
महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. काम करीत असताना त्यांनी सदरचा धनादेश रात्री ८ वाजता देण्याचे आदेश दिले त्यासंदर्भातील टिप्पणी बदलण्यात आली, असे त्यावेळी औट घटकेचे प्रभारी अधीक्षक अभियंता अग्रवाल यांनी सांगितल्याचे दिनकर पाटील यांनी महासभेत सांगितले होते, तर ५६ कोटी रुपये संबंधित जागामालकाला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिले. त्यानंतर २९ कोटी रुपये इतकाच मोबदला देण्यात आला.त्यावेळी ज्याप्रमाणे स्थायी समितीवर विषय मांडण्यात आला तसाच
प्रस्ताव आताही नियमानुसार
स्थायी समितीवर मांडणे आवश्यक होते, असे नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी स्थायी समितीच्या बैठकीतच सांगितले होते. त्यामुळे यांनादेखील चौकशीला बोलविले जाणार आहे. तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांनीदेखील वेळोवळी वेगवेगळी माहिती दिली असल्याने त्यांनादेखील पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.