इंग्रजी माध्यम आश्रमशाळा कंत्राटी शिक्षक भरती रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:31 AM2022-02-12T01:31:45+5:302022-02-12T01:33:28+5:30
कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शासकीय आश्रमशाळेत मानधन तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या अनुषंगाने कळवण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेत पुन्हा नव्याने शिक्षक भरती स्वतःच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर केले आहे.
कळवण : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शासकीय आश्रमशाळेत मानधन तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या अनुषंगाने कळवण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेत पुन्हा नव्याने शिक्षक भरती स्वतःच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर केले आहे.
या प्रक्रियेतील आर्थिक देवाण-घेवाणीची चर्चा आदिवासी आयुक्तालयापर्यंत पोहोचल्याने व भरतीप्रकरणी आस्थापना विभागाचा पदभार असलेला कळवण प्रकल्प कार्यालयातील अधिकारी चार ते पाच दिवसांपासून उपस्थित नसल्याने यात गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावला आहे. कळवण प्रकल्पांतर्गत सराड (ता. सुरगाणा), कनाशी (ता. कळवण), भिलवाड (ता. बागलाण) येथे इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र आणि २०२२-२३ या नव्या शैक्षणिक वर्षात इंग्रजी विषय शिकविण्यासाठी शाळानिहाय चार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. ही पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्त्वावर करार पद्धतीने भरण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी घेतला होता. दि. २ फेब्रुवारीला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र, या संबंधित निवड प्रक्रियेला प्रकल्प अधिकारी विकास मीना यांना अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे व इतरत्र कामानिमित्त ते गेल्यामुळे उमेदवारांच्या मुलाखतीसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत मुलाखती घेण्यात आल्या; परंतु याचवेळी निवड समितीचे अध्यक्ष व आस्थापना विभागाचे अधिकारी यांच्याकडून खासगी मध्यस्थींमार्फत नियुक्तीसाठी उमेदवार गाठून व निवडक उमेदवारांना या अधिकाऱ्याने घरी बोलावून आर्थिक गैरव्यवहार केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दि. २२ जानेवारी व २ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे मुलाखतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १२ जागांसाठी सुमारे १४० ते १५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मानधन तत्त्वावर करार पद्धतीने नियुक्त उमेदवारांना १२५ रुपये प्रतितासप्रमाणे मासिक १३ हजार १२५ रुपये मानधन स्वरुपात दिले जाणार आहेत.
काही उमेदवारांना मुलाखतीला येऊ न दिल्याने त्यांनी कळवण प्रकल्प कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रारी दाखल केल्या असून, या आश्रमशाळांवर सुरुवातीपासून मानधन तत्त्वावर असलेल्या अनुभवी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना या भरतीत प्राधान्य देण्याची मागणी केली जात आहे.