लोहोणेर येथे इंग्रजी यात्रा

By admin | Published: January 16, 2016 11:02 PM2016-01-16T23:02:52+5:302016-01-16T23:03:41+5:30

वसाका : इंग्रजी सहज, सोप्या भाषेत करण्यासाठी ‘डेल्टा’ अभिनव उपक्रम

English tour at Lohonar | लोहोणेर येथे इंग्रजी यात्रा

लोहोणेर येथे इंग्रजी यात्रा

Next

लोहोणेर : इंग्रजी भाषा शिकणे ही कंटाळवाणी प्रक्रि या अधिक आनंदायी करण्यासाठी देवळा तालुक्यात इंग्रजी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या संघटनेने इंग्रजी यात्रा या आगळ्यावेगळ्या एकदिवसीय कार्यक्रमाचे डॉ. डी. एस. अहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल वसाका (वि.) येथे आयोजन केले. या इंग्रजी यात्रेचे उद्घाटन कसमादे परिसर विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवळा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील विषय शिक्षक उपस्थित होते. यात्रा या शब्दाला मुलांच्या भावविश्वात अनन्यसाधारण महत्त्व असते. मुलं यात्रेची आतुरतेने वाट पाहतात व यात्रेचा पुरेपूर आनंद घेतात. या सर्व बाबींचा विचार करत ब्रिटिश कौन्सिलचे तद्न्य मार्गदर्शक भगवान अहेर, बी.के. पाटील, लांडगे, एस.टी. पाटील यांच्या उपक्रमशील विचारातून देवळा तालुक्याची देवळा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन (डेल्टा) संघटना स्थापन करत इंग्रजी विषयाचे अध्यापन पारंपरिक पद्धतीने करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय या गोष्टींवर मंथन करत इंग्रजी विषय यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत देवळा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व इंग्रजी विषयाची गोडी असणाऱ्या निवडक शाळास्तरावरील दहा विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. या यात्रेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी इंग्रजी संभाषणासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती खूपच उपयुक्त ठरली. या यात्रेत आलेल्या विद्यार्थ्यांचे वॉमर्स, गेम्स यांच्या मदतीने नऊ गट तयार करण्यात आले. या गटातून विद्यार्थ्यांनी विविध अ‍ॅक्टिव्हीटी प्रत्यक्ष कृतीतून घेण्यात आल्या.
अ‍ॅक्टिव्हीटी गट : या गटातून विविध कृतीच्या माध्यमातून इंग्रजी संभाषणाचा सराव व तोही आनंदायी पद्धतीने देण्यात आला.
गेम मॉल्स गट : गटातून खेळाच्या माध्यमातून भाषा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. हॉट सिट क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांनी संभाषणाचा आनंद घेतला.
थिएटर मॉल्स गट : या दृकश्राव्य साधनांचा उपयोग करत या गटातून विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य तपासून प्रश्नांची उत्तरे देणे किंवा लेखी स्वरूपात उपयोजन करणे असा सराव देण्यात आला.
आॅडिओ मॉल्स गट :- या गटात फक्त विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य तपासण्यात येऊन विद्यार्थ्यांना काही अंश ऐकायला देऊन त्यांचा लेखी स्वरूपात प्रतिसाद तपासण्यात आला.
पोस्टर मॉल गट : या गटात विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा व आपली कलाकृती इतरांनी पहावी हे प्रत्येकाला वाटणारी भावना विचारात घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पोस्टर्सला संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय कलाकुसरीने यात विविध विषयांवर पोस्टर्स बनवले होते.
डोमेस्टिक मॉल गट : दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या सर्व वस्तूंचा या गटात समावेश करण्यात आला होता. अत्यंत कल्पक पद्धतीने
ही स्पर्धा आयोजित करून मनोरंजनातून अध्ययन या गटात विद्यार्थ्यांनी घेतले.(वार्ताहर)

 

Web Title: English tour at Lohonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.