पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये उत्साह
By Admin | Published: February 20, 2017 12:31 AM2017-02-20T00:31:43+5:302017-02-20T00:31:59+5:30
संकल्प : विचार करूनच मत देण्याचा निर्णय
नाशिक : महापालिकेच्या प्रचार तोफा थंडावल्या असून, सध्या मतदान करण्यासाठी नवमतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तरुण वर्ग आपल्या अमूल्य मतांबद्दल जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच मतदान करीत असलो तरी आम्ही उत्साहाच्या भरात कोणालाही मतदान करणार नाही. आमचे मत विचार करूनच देणार, असा संकल्प नाशिकच्या नवमतदारांनी केला आहे. त्यामुळे तरुणाईचे हे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होत असून, गेल्या महिन्यापासून सुरू असलेला प्रचाराची रविवारी (दि.१९) संध्याकाळी ५ वाजता सांगता झाली आहे. आता गुप्त स्वरूपात उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. अशाप्रकारे गुप्त प्रचार करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने नवीन मतदारांवर अधिक लक्ष आहे. त्यामुळे नवीन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवारांकडून होत आहे. त्यासाठी विविध प्रकारची प्रलोभनेही दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु, महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणवर्गाने आपला स्वाभिमान अबाधित राखण्याचा ठाम निश्चय केला असून, राज्यघटनेने दिलेल्या या अधिकाराचा पुरेपूर वापर करणार असल्याच्या प्रतिक्रिया पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळालेल्या नवमतदारांनी दिल्या आहेत. नवीन मतदारांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. या नवमतदारांच्या मतांवरही निवडणुकीचे चित्र पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. (प्रतिनिधी)