नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 08:31 PM2017-09-05T20:31:15+5:302017-09-05T20:31:56+5:30
नाशिक शहरात दुपारी साडे बारा वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक होळकर पुलाजवळ पोहचली आहे.
नाशिक, दि. 5 - नाशिक शहरात दुपारी साडे बारा वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक होळकर पुलाजवळ पोहचली आहे. येथून पंचवटी कारंजा मार्गे गोदावरीचे अंतर किमान एक किलोमीटर आहे. जवळपास नऊ तासांपासून मिरवणुकीत सहभागी मंडळांचे गणेशभक्त मार्गक्रमण करीत आहे. मिरवणुकीत एकूण 21 मंडळ सहभागी असून शेवटचं मंडळ अद्याप प्रारंभ ठिकाण जुन्या नाशकात शहीद अब्दुल हमीद चौकात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे. सुमारे दहा वाजता महापालिका कर्मचाऱ्यांचा पहिला मंडळ गोदावरी वर पोहचण्याची शक्यता. ढोलवादानाच्या तालावर गणेशभक्त जल्लोष करीत संथ मार्गस्थ होत आहे.
विशेष म्हणजे नाशिकमध्ये गणेशमूर्ति दान करण्यास भविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक मूर्ति संकलित झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. गोदाघाटावर विविध संस्था मूर्ती संकलनसाठी सहभागी झाल्या आहेत.