रक्षाबंधनानिमित्त राखी खरेदीचा उत्साह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:35+5:302021-08-22T04:17:35+5:30
नाशिक : रक्षाबंधनानिमित्त शहरात शनिवारपासून राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. त्याशिवाय सणाच्या निमित्ताने मिठाई तसेच भेटवस्तूंच्या दालनातही नागरिकांनी गर्दी ...
नाशिक : रक्षाबंधनानिमित्त शहरात शनिवारपासून राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. त्याशिवाय सणाच्या निमित्ताने मिठाई तसेच भेटवस्तूंच्या दालनातही नागरिकांनी गर्दी केली हाेती.
बहीण भावाच्या प्रेमाचा स्नेहबंध आयुष्यभर अतूट करणारा हा सण आहे. या विधीस शास्त्रात ‘पवित्रारोपण’ असेही म्हटले जाते. त्यात भावाचा उत्कर्ष व्हावा अशा सदिच्छेसह प्रत्येक बिकटसमयी आपणच एकमेकांसाठी आहोत, ही मंगल मनोकामना असते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे असाही असतो. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. तसेच पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम काही दिवसांसाठी पुन्हा अनुभवता यावे, असाच त्यामागील उद्देश आहे. एक शाश्वत पाठीराखा कोणी असला की आपोआपच आपल्या अंगात बळ संचारते. कोणत्याही क्षणी बालपणाप्रमाणेच हाक मारताच किंवा न मारतादेखील केवळ गरज जाणून घेत धावून येणारा भाऊ आणि भावाच्या गरजेच्या वेळी त्याच्या मदतीला धावणारी बहीण हे नाते आयुष्यभरासाठी तितकेच मोलाचे असते. त्या नात्याला उजाळा देणारा हा रक्षाबंधनाचा सण रविवारी आला आहे.
इन्फो
यंदाच्या सणाला भावनिक किनार
जे भाऊ किंवा बहीण कोरोनाच्या दिव्यातही एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या घरी डबे पोहोचवत त्यातून सुखरूपपणे बाहेर पडले, अशा भावंडांसाठीदेखील रक्षाबंधनाचा सण विशेष महत्त्वाचा आहे. ज्या काळात कुणीच साथ देत नव्हते, त्यावेळी भावाने बहिणीला औषधोपचारापासून डबे पोहोचविण्यापर्यंत तसेच मानसिक सर्व प्रकारे भक्कम साथ दिली. अशा बहिणींना कधी एकदा भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधते, असे झाले आहे, तर ज्या बहिणींनी भावाला आर्थिक, मानसिक अशी सर्व प्रकारची मदत केली, त्या भावांना यंदाच्या रक्षाबंधनाला पूर्वीच्या रक्षाबंधनापेक्षा मोठी भेटवस्तू देऊन बहिणीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे वेध लागले आहेत. त्यात यंदा रक्षाबंधनाचा सण रविवारी आल्याने शासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या भावंडांनाही रक्षाबंधनासाठी बहिणींकडे जाता येणे शक्य होणार आहे.