भरपावसातही भाविकांचा दांडगा उत्साह
By admin | Published: September 19, 2015 12:01 AM2015-09-19T00:01:34+5:302015-09-19T00:06:08+5:30
भरपावसातही भाविकांचा दांडगा उत्साह
नाशिक : तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला रात्री ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यानंतर संततधार धरूनही भरपावसात भाविकांचा गोदास्नानासाठी दांडगा उत्साह दिसून आला. शाही मिरवणुकीत रथारूढ महंतांनीही रामकुंडात शाहीस्नानापूर्वी पर्जन्यस्नानाची अनुभूती घेतली.
तिसऱ्या शाही पर्वणीला रात्री १ वाजेपर्यंत गोदाघाट परिसरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र, त्यानंतर साधुग्राममधून काही धार्मिक संस्थांच्या प्रमुखांसोबत असंख्य भाविकांचे जथ्थे गोदाघाट परिसराकडे स्नानासाठी मार्गक्रमण करताना दिसून आले. मात्र, पहाटे ३ वाजेच्या सुमारास पावसाचे विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन झाले आणि अनेकांची तारांबळ उडाली. परंतु, स्नानासाठी जाणाऱ्या आणि स्नान करून येणाऱ्या भाविकांचा उत्साह दांडगा होता. भरपावसात हजारो भाविकांनी गोदास्नान केले. पंचवटी अमरधामकडील नवीन शाहीमार्ग तर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी पंचवटी अमरधामचा आश्रय घेतला तर अनेकांनी टाळकुटेश्वर पुलाजवळ अग्रवाल सभेने उभारलेल्या मंडपात धाव घेतली. त्यानंतर साधुग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीत सहभागी झालेल्या साधू-महंतांनाही पावसात भिजतच रामघाटाकडे मार्गस्थ व्हावे लागले. आखाडे व खालशांनी आपल्या श्रीमहंतांसाठी वाहनांवर सिंहासनाची सजावट करून ठेवली होती. परंतु नियोजित वेळेत मिरवणूक रामकुंडावर जाणे आवश्यक असल्याने आखाड्यांना भरपावसातच मिरवणूक काढावी लागली. त्यामुळे रथारूढ महंतांना शाहीस्नानापूर्वीच पर्जन्यस्नानाचा अनुभव घ्यावा लागला. काही महंतांनी स्वत:च छत्री हाती धरत तर काहींनी रेनकोट परिधान करत पावसापासून आपला बचाव केला. अनेकांनी वाहनात बसणेच पसंत केले. रथावर आरूढ झालेले काही साधू तर भरपावसात चिलीम ओढताना दिसून आले. (प्रतिनिधी)