गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
By admin | Published: September 15, 2016 12:22 AM2016-09-15T00:22:49+5:302016-09-15T00:26:22+5:30
भक्तिमय सोहळा : मोरया...मोरयाचा गजर; रस्ते गर्दीने फुलले
नाशिक : शहरात बाप्पा विराजमान झाल्यानंतर वरुणराजांचे आगमन आणि गौरी तथा महालक्ष्मीच्यानिमित्ताने माहेरवाशिणींचा पाहुणचार तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांनी गणेश भक्तांमध्ये संचारलेला उत्साह बुधवारी शिगेला पोहोचला. गेल्या दहा दिवसांत अनेक कारणांनी गणपती दर्शन व देखावे पाहू न शकलेल्या गणेशभक्तांसह यंदाचा गणेशोत्सव डोळ्यांत साठवून अविस्मरणीय करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली.
शहरातील सर्व गणेश मंडळांमध्ये संध्याकाळच्या आरतीसाठी मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रविवार कारंजा, मेनरोड परिसर, भद्रकाली, गाडगे महाराज चौैक, शालिमार चौक , बी. डी. भालेकर मैदान, टिळकपथ, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, पेठरोड आदि भागात शहरवासीयांनी आरतीसाठी गर्दी केली. भक्तजनांनी केलेला मोरया... मोरया...चा गजर, अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध आणि आरतीच्या सुमधुर सुरांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले.
बाप्पाचे आगमन होऊन दहा दिवस उलटले असून नागरिकांनी गौरींना निरोप दिल्यानंतर दररोज जसा वेळ मिळेल तसे बाप्पांच्या दर्शनासोबतच देखावे पाहण्याचा आनंदही घेतला. दरम्यान, गेल्या दहा दिवसांत उत्साहाचे नियोजन आणि गर्दीचे नियंत्रण यात गुंतलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्सव निर्विघ्न पार पडल्याचे समाधान दिसत असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरणूकही निर्विघ्न पार पडावी यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. (प्रतिनिधी)