नाशिकच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणस्रेही गणेशोत्सवावर भर, कागदी गणेशमुर्तींची निर्मीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:05 PM2018-09-07T13:05:58+5:302018-09-07T13:08:22+5:30
मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत लहानमोठ्या आकारातल्या वैशिष्टयपुर्ण मुर्ती साकारल्या
नाशिक- आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य मानले जाते. त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला घातक गोष्टी टाळून पर्यावरणपुरक गोष्टींचा आग्रह धरला तर त्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसेल. याचा प्रत्यय देणारा उपक्रम नाशिकच्या पेठे हायस्कूलमधील राबविण्यात आला असून त्यामुळे उद्याचे भविष्य उज्वल असेल याची खात्री पटू शकणार आहे.
पेठे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शाळेने आयोजीत केलेल्या मुर्ती कार्यशाळेत कागदापासून सुरेख मुर्ती साकारल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ ही कल्पना समोर ठेवत विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशमुर्ती बनवल्या असून स्वत:च्या कृतीतुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने रद्दी उपलब्ध करुन दिली. त्यापासून मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत लहानमोठ्या आकारातल्या वैशिष्टयपुर्ण मुर्ती साकारल्या. त्यांच्यावर रंगरंगोटी, सजावटकामही केले. मुलांच्या कलाविष्कार पाहून शिक्षक, पालकही भारावून गेले होते. चित्रकलेचे शिक्षक मनिष जोगळेकर यांनी मुलांना मार्गदर्शन करीत त्यांच्यातल्या सृजनशिलतेला प्रोत्साहन दिले. मुर्ती तयार झाल्यावर त्या नैसर्गिक रंगांनी रंगविण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या मुर्ती घरी नेल्या असून त्यांची प्रतिष्ठापनाही करण्यात येणार आहे. शाडूमातीच्या मुर्ती फार मोठ्या आकारात तयार करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कागदाचे माध्यम वापरण्यात आले. ते यशस्वी झाल्याने पुढिल वर्षी आणखी चांगल्या मुर्ती साकारण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. कागद, टिशु पेपर, लाकुड, डिंक, तार व सजावटीसाठी मोती, डायमंडचा वापर केला गेला. मुर्ती साकारताना मुलांच्या चेहेऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. मुर्ती घरी नेल्यानंतर पालक, नातेवाईक, मित्रमंडळी यांनीही त्याचे कौतुक केल्याने मुले आनंदी झाली होती.