उत्साह : शिंगवेत गोदाकाठावरील भक्तिरंगाची सांगता ग्रामस्थांना ‘मांड्यांचे’ जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:22 AM2018-05-27T00:22:07+5:302018-05-27T00:22:07+5:30
सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले.
सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले.
गोदावरी नदीच्या काठावरील परमपूज्य शंकरपुरी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या पवित्र सान्निध्यात अधिकमासानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. विशेष म्हणजे सांगता समस्त ग्रामस्थांना मांड्यांचे जेवण देऊन झाल्याने ज्ञानरसाबरोबरच आमरसाच्या मेजवानीने ग्रामस्थांसह पाहुणेही तृप्त झाले.
यानिमित्त दर तीन वर्षाने शिंगवेतील शंकरपुरी महाराज भक्त मंडळ (देवगल्ली), शंकरपुरी महाराज भजनी मंडळ व शिंगवे ग्रामस्थ विशेष अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात. दररोज अन्नदात्यांच्या सहकार्याने ग्रामस्थांना भोजन देण्यात येत होते. विशेष म्हणजे तानाजी रायते या युवा शेतकऱ्याने नफा-तोट्याचा विचार न करता सप्ताहासाठी जागा उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे अनेकांचे सहकार्य या सप्ताहास लाभले.
सप्ताहात वृषपूर्वा कदम, उत्तम महाराज बढे, विवेक महाराज केदार, सुधाकर महाराज वाघ, दीपक महाराज देशमुख, रोहिदास महाराज हांङे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची कीर्तने झाली. तसेच रामायणाचार्य संदीपन महाराज रायते यांच्या रामायण कथेचं प्रवचन झाले. तर काल्याचे कीर्तन केशव महाराज उखळीकर यांनी केले.
अधिकमास झाला गोड
काल्याच्या कीर्तनानंतर चुलबंद आवतान देत मांड्यांच्या जेवणाचा बेत ठेवला होता. आंबेरस, मांडे, सारभात, भजी, कुरडई असा महाप्रसादाचा मेनू होता. गाव तर जेवलेच पण पाहुण्यांनाही मांड्यांच्या जेवणाचे आमंत्रण दिले होते. दररोज गोदाकाठ रंगलेल्या भक्तीच्या रंगाबरोबरच मांड्यांच्या जेवणाने सांगता झाल्याने शिंगवेकरांचा अधिकमास अधिक गोड झाला.