बाजारपेठेत संक्रांतीच्या खरेदीचा उत्साह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:49+5:302021-01-14T04:12:49+5:30
नाशिक : नात्यांमधील स्नेहमयी गोडवा वाढविणारा, गुळाच्या पोळ्यांनी आणि तिळगुळाच्या लाडवाने संपूर्ण दिवस गोड करणाऱ्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहराच्या ...
नाशिक : नात्यांमधील स्नेहमयी गोडवा वाढविणारा, गुळाच्या पोळ्यांनी आणि तिळगुळाच्या लाडवाने संपूर्ण दिवस गोड करणाऱ्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहराच्या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. कुणी रेडीमेड तीळगूळ लाडू, कुणी काळी वस्त्रप्रावरणे तर कुणी चिक्कीचा गूळ, तीळ तर कुणी पतंगांचे गठ्ठे आणि रिळ तर महिला वर्ग वाण देण्याचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत आल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत होता.
मकरसंक्रातीच्या खरेदीसाठी बुधवारी दिवसभर बाजारपेठ फुलून गेल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये संक्रांतीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. साखरेचा हलवा, तीळगुळाचे लाडू, सुगडी, काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह पूजेचे साहित्य घेण्यासाठीची लगबग महिलावर्गात दिसून आली.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन, सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. उत्तरायणात सूर्य असण्याचा काळ हा शुभ काळ मानला जातो. यावेळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकरसंक्रांती म्हणतात. या सणाच्या निमित्ताने एकमेकांना तीळगुळासह शुभेच्छांचे आदानप्रदान करण्याची परंपरा आहे, तसेच महिलावर्ग हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेत, सौभाग्याचे वाण एकमेकींना देत असतात. त्यामुळे संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारात उपलब्ध असलेले वैविध्यपूर्ण वाण खरेदीसाठी महिलावर्गाची सकाळपासूनच बाजारात लगबग होती. मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील दुकानांत वाणासाठी विविध वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे, तसेच संक्रांत सणाला काळ्या रंगाच्या वस्त्रांचे महत्त्व असल्याने, कपड्यांच्या दुकानांत काळी वस्त्रे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्यासही महिलावर्गाने पसंती दिली. संक्रांतीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपुलासह उपनगरांतील दुकांनात गर्दी केली, तसेच विविध आकारांच्या पतंग खरेदीसाठीही बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.
इन्फो
सामाजिक अंतराचा विसर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या यंदांच्या संक्रांत सणात खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीत नागरिकांना सामाजिक अंतराचा विसर पडल्याचेच दिसून आले. मात्र, किमान बहुतांश महिला आणि नागरिकांनी मास्क घातल्याचे दिसत होते.