संपूर्ण देवळा तालुका कोरोनाग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:50+5:302021-05-01T04:13:50+5:30
संजय देवरे/देवळा : तालुक्यात गतवर्षी सर्वत्र कोरोना फैलावत असताना आठ गावे मात्र कोरोनामुक्त राहिली होती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ...
संजय देवरे/देवळा : तालुक्यात गतवर्षी सर्वत्र कोरोना फैलावत असताना आठ गावे मात्र कोरोनामुक्त राहिली होती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र सर्व गावे कोरोनाग्रस्त झाली आहेत. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर सुरूवातीला दोन महिने देवळा तालुका कोरोनामुक्त होता. मे महिन्यात मुंबईस्थित एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या दहिवड गावातील एका तरूणाला कोरोना झाला व देवळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दहिवड येथे कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकाबंदी केली. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला. ग्रामीण भागात काही गावांमध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास संभाव्य कारण ठरणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्याचा काही प्रमाणात लाभ होऊन तालुक्यातील कांचणे, हनुमंतपाडा, म. फुलेनगर, वासोळपाडा, भावडे, रामनगर, वऱ्हाळे, सांगवी आदी आठ गावे कोरोनामुक्त राहिली होती. नंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेली व कोरोनाची पहिली लाट ओसरली. नागरिकांनीही कोरोनाची भीती मनातून काढून टाकत आपले दैनंदिन व्यवहार सुरू केले. मास्कचा वापर, स्वच्छता, व सामाजिक अंतर ह्या कोरोना नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच चालूवर्षी फेबुवारी महिन्यात दहिवड - मेशी शिवारात झालेल्या एका लग्न सोहळ्यासाठी इतर जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यांनी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढवला. नागरिकांची ही बेफिकिरी घातक ठरली व कोरोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी ठरून मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊन रुग्णांची संख्या वाढू लागली. या वाढत्या रूग्णसंख्येला आरोग्य यंत्रणाही अपुरी पडू लागली. आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या या गावांमध्येही कोरोनाचे रूग्ण सापडू लागले आहेत.
इन्फो
पाच गावेही विळख्यात
काचणे, भावडे, हनुमंत पाडा, वऱ्हाळे, वासोळपाडा ही पाच गावे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्याच्या सुरूवातीपर्यंत कोरोनामुक्त होती. परंतु, आता ह्या गावांतही कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्यामुळे देवळा तालुक्यात एकही गाव आता कोरोनामुक्त राहिलेले नाही.
कोट...
कांचणे गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाबाबत माहिती दिली, तसेच ग्रामपंचायतीने मास्कचे वाटप केले. कोरोना झाला तर दवाखान्यासाठी येणारा अवाढव्य खर्च, याबाबत कल्पना दिली. तसेच मोलमजुरीसाठी बाहेरगावी कोणी जाऊ नका, ह्या सूचनेचे त्यांनी पालन केले. इतर गावांशी संपर्क ठेवला नाही, त्यामुळे कांचणे गावात कोरोनाचा संसर्ग झाला नाही. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेजारील गावांमध्ये शेतमजुरीसाठी गेलेल्या मजुरांचा कोरोना रूग्णांशी संपर्क येऊन कांचणे गावात कोरोनाचा शिरकाव झाला.
- ॲड. तुषार शिंदे, उपसरपंच, कनकापूर ग्रामपंचायत
कोट....
भावडे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ हे शेतावर वस्ती करून राहतात. त्यांचा एकमेकांशी संपर्क आला नाही तसेच कोरोनाच्या भीतीमुळे प्रवास टाळून नियमांचे पालन केल्याचा फायदा होऊन पहिल्या कोरोना लाटेत भावडे गाव कोरोनामुक्त राहिले. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी बेफिकिरी दाखवत इतरत्र केलेला मुक्तसंचार, अंत्यविधी, लग्न सोहळ्यांना केलेली गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन यामुळे गावात कोरोनाचे संक्रमण वाढले.
_ रमेश भदाणे, उपसरपंच, कापशी ग्रामपंचायत