मुक्त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होणार
By Admin | Published: July 8, 2017 12:11 AM2017-07-08T00:11:57+5:302017-07-08T00:12:15+5:30
नाशिक : अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते. अशावेळी पारंपरिक विद्यापीठातून शिक्षण घेणे शक्य होत नाही, तर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेताना प्रवेशप्रक्रियेच्या काळात प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे वर्ष वाया जाते. तसेच बारावीच्या पुनर्परीक्षार्थींनाही प्रवेश मिळावा, यासाठी मुक्त विद्यापीठासमोर शैक्षणिक वर्षात वर्षातून दोनदा प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत वायुनंदन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय्य साकारण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रा. ई. वायुनंदन यांनी सांगितले. दहावी, बारावी किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मानव्य विद्या व सामाजिकशास्त्र विभागात प्रमाणपत्र, पूर्वतयारी शिक्षणक्रमासह विद्यापीठात उपलब्ध १०७ विषयांसाठी प्रवेश घेता येणार आहे. सर्व विषयांच्या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासंबंधी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यापीठातील रखडलेल्या पदोन्नत्या करण्यात आल्या असून, अन्य प्रलंबित प्रक्रियांवरही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. प्रकाश अतकरे, डॉ. अर्जुन घाटुळे आदि उपस्थित होते.