उद्योजक भंवरलाल जैन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 11:47 PM2016-02-25T23:47:53+5:302016-02-25T23:55:45+5:30
शनिवारी अंत्यसंस्कार : सूक्ष्मसिंचनाच्या प्रसारासाठी योगदान
जळगाव : जळगावचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन (७८) यांचे गुरुवारी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. शनिवारी दुपारी ३ वाजता जैन हिल्स येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जैन यांची प्रकृती बरी नसल्याने मुंबई येथील जसलोक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी जिल्ह्णातील शेतकरी, सामाजिक व विविध संस्थांतर्फे सामूहिक प्रार्थनाही झाल्या. ते उपचारांना प्रतिसाद देत असताना गुरुवारी मात्र त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या पश्चात अशोक, अनिल, अजित व अतुल जैन हे पूत्र, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
जैन यांचा जन्म वाकोद (ता. जामनेर) येथे १२ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. जळगाव ही त्यांची कर्मभूमी होती. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक, तज्ज्ञांना रोजगार दिला. ‘लाखोंचा पोशिंदा’ म्हणूनही ते ओळखले जायचे. त्यांनी केळीचे उतिसंवर्धित रोपांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले त्यामुळे केळीच्या उत्पादकतेमध्ये मोठी वाढ झाली.
(पान ७ वर)
सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांना पद्मश्री तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यातर्फे जीवनगौरव आदी प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले होते; तर कोईम्बतूर कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ, उदयपूर येथील कृषी व तंत्रज्ञान संस्था यांनी डॉक्टर आॅफ सायन्स व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)