दिंडोरीत उद्योजकांनी दिले 75 ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:30 AM2021-04-23T01:30:55+5:302021-04-23T01:31:31+5:30
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत एकाच दिवसात तब्बल ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांचेकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.
दिंडोरी : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत एकाच दिवसात तब्बल ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांचेकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.
ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनटंचाई भासू लागली होती. त्याची तीव्रता लक्षात घेऊन झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली गतिमान केल्या. एखाद्या हॉस्पिटलमध्ये वेळेत ऑक्सिजन न पोहोचल्यास अनेकांचा जीव टांगणीला लागणार होता. त्यामुळे झिरवाळ यांनी तातडीने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्या सोबत चर्चा करत काही उद्योजकांशी चर्चा केली. त्यांच्याकडे उपलब्ध ऑक्सिजन या कठीण प्रसंगी देण्याचे आवाहन करण्यात आले.
झिरवाळ यांच्या आवाहनास उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दिंडोरी तहसील कार्यालयात काही तासांत ७५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर जमा झाले असून, ते आता गरजेनुसार वेगवेगळ्या हॉस्पिटलला पुरवले जाणार आहेत. राज्यात आदर्शवत असा प्रतिसाद उद्योजकांनी दिल्याबद्दल विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे आभार मानत इतर उद्योजकांनीही त्यांच्याकडे असलेली ऑक्सिजन सिलिंडर हॉस्पिटलला पुरवून कोविडच्या या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले.