दरवाढीविरुद्ध उद्योजकांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:04 PM2020-02-08T23:04:08+5:302020-02-09T00:27:39+5:30
मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.
सातपूर : मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महावितरण कंपनीचे चेअरमन असीमकुमार गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. राज्यात सातत्याने औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज दरवाढीचा परिणाम नवीन गुंतवणुकीवर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करणारे उद्योग राज्याबाहेर जात आहेत. महावितरणने पुनश्च वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची सहनशीलता संपत चालली आहे. हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी क्रॉस सबसिडी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनी शासनाची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
चेंबरच्या ऊर्जा समितीचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनीही समस्या मांडली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार शिरीष चौधरी, अनिल गचके, डॉ. एस. एस. पाटील, भरत अग्रवाल, सुरेश चौहान, संजय शेटे, अमित हुक्केरीकर आदी उपस्थित होते.
राज्याचे वीजदर कमी असावेत ही प्रामाणिक इच्छा आहे. परंतु महावितरणचे तत्कालीन चेअरमन संजीवकुमार यांनी ऊर्जामंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर वीज नियामक आयोगाकडे वीजदर प्रस्ताव सादर केला आणि वीज नियामक आयोगाने सुनावणींचा कार्यक्रम आखल्यामुळे सदर प्रस्ताव शासनास परत घेणे अथवा दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र व्यापारी उद्योजकांनी अभ्यासपूर्वक विरोध नोंदवावा. तसेच वीजदर कमी करण्यासाठी जनसामान्यातून काही अभ्यासपूर्वक सूचना असल्यास ऊर्जा खाते त्याचे स्वागत करेल आणि वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.