‘स्मार्ट सिटी’साठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक
By admin | Published: October 25, 2015 10:47 PM2015-10-25T22:47:09+5:302015-10-25T22:47:36+5:30
दीपेंद्रसिंह कुशवाह : निमामध्ये चर्चासत्र संपन्न
सातपूर : देशातील दहा शहरांचा सर्व बाजूंनी नाशिक शहराच्या तुलनेने सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाला निमा किंवा अन्य संस्थांनी अहवाल सादर केल्यास त्याचा फायदा स्मार्ट सिटी करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.
निमा येथे आयोजित ‘नाशिक : गुंतवणुकीचे पुढील केंद्र’ या विषयावर चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. नाशिक औद्योगिकदृष्ट्या परिपूर्ण शहर आहे. जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, रस्ते, रेल्वे, मूलभूत सेवासुविधा यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ ते १५ दिवसांच्या आत सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योग क्षेत्रासाठी औद्योगिक संस्थांनी ३०० ते ५०० एकर जमीन सुचविल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ती जमीन हस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशीही ग्वाही जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीसाठी निमा या औद्योगिक संस्थेने देशातील बंगळुरू, अहमदाबाद, पुणे, बडोदा, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या १० शहरांचा तुलनात्मक सर्वेक्षण करून अहवाल दिल्यास त्याचा नाशिकसाठी फायदा होईल, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार, महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, ऋषभ कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, सॅमसोनाईटचे वाय. एम. सिंग, नाशिक इंजिनिअरिंग ब्लस्टरचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, व्हिनस वाणी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मधुकर ब्राह्मणकर, नगरसेवक शशिकांत जाधव, निशिकांत अहिरे, मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर, समीर पटवा, सुधाकर देशमुख, मिलिंद राजपूर, प्रमोद पुराणिक, जितुभाई ठक्कर आदिंनी चर्चेत भाग घेतला. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)